पहिलवान अशी ओळख असलेले भाजपाचे आमदार महेश लांडगे “बाई वाड्यावर या…”, “पहिलवान आला..” या गाण्यांवर अभिनेत्री मानसी नाईकसह थिरकताना दिसले. निमित्त होतं ‘‘हॅप्पी स्ट्रीट- 2022 ’’या कार्यक्रमाचे. हा कार्यक्रम चिखली-मोशी येथे आयोजित करण्यात आला होता. विशेष अतिथी म्हणून अभिनेत्री मानसी नाईकला बोलावण्यात आलं होतं. यावेळी मानसी नाईकने काही गाण्यांवर थिरकत उपस्थितांची मने जिंकली.
भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी चिखली-मोशी येथील वुड्सविल्ले फेज – 2 या ठिकाणी ‘हॅपी स्ट्रीट- 2022’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकाऱ्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री मानसी नाईकची विशेष उपस्थिती होती, तिने अनेक गाण्यांवर डान्स सादर केला.
दरम्यान, बाई वाड्यावर या गाण्यावर मानसी नाईकने आमदार महेश लांडगे यांना आपल्या सोबत नाचण्यास भाग पाडले. या वेळी लांडगे यांनी मिशिला पिळ मारत आणि हात वर करत ठेका धरल्याचं दिसून आलं . तर, पहिलवान आला…पहिलवान आला या गाण्यावर देखील आमदार महेश लांडगे यांनी दोन्ही हात उंचावत ठेका धरला. महेश लांडगे हे भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार आहेत. त्यांनी केलेल्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.