पुण्यातील संभाजी बागेतील राम गणेश गडकरी यांचा पुतळा मागील दोन महिन्यापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यानी हटवला होता. त्यावर मोठा वाद निर्माण झाला होता. आता राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यासोबतच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा देखील सन्मानाने बसविला पाहिजे अशी मागणी भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी आज केली. त्यांच्या या भूमिकेने भविष्यात वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी उद्यानातून हटवल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी भाजप आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या होत्या की, महापालिकेत भाजप ची सत्ता आल्यास महिन्याभरातच गडकरींचा पुतळा सन्मानाने बसवू.
त्यांच्या विधानाचा संभाजी ब्रिगेड संघटनेनी निषेध केला होता. आज आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, थोर नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा सन्मानाने बसविण्याची जबाबदारी ही महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांची आहे. गडकरी यांच्या पुतळ्यासोबतच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा देखील सन्मानाने बसविण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करीन. अशी भूमिका आमदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली आहे.