पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शैलेश टिळक, कुणाल टिळक, श्रुतिका टिळक, चैत्राली टिळक-भागवत, हर्षद भागवत, रोहित टिळक, दीपक टिळक, प्रणिती टिळक उपस्थित होते.
केसरीवाडा येथील निवासस्थानी मुक्ता टिळक यांचे पार्थिव आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अंत्यदर्शना करीता ठेवण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,आमदार प्रविण दरेकर, माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दर्शन घेतले. त्यानंतर केसरीवाडा ते नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमी दरम्यान अंत्ययात्रा काढण्यात आली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.