पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून उपचारासाठी पैशांची अडवणूक केल्याने तनिशा यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, तनिशा यांना प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी कुटुंबिय घेऊन गेले.त्यावेळी तेथील डॉक्टरांनी तनिशा यांची तपासणी केली आणि जुळ्या मुली आहेत.तसेच शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याचे कुटुंबियांना सांगण्यात आले.
या शस्त्रक्रियेकरीता २० लाख रुपयांचा खर्च येईल आणि सुरुवातीला किमान १० लाख रुपये तरी भरावे लागतील, असे कुटुंबियांना डॉक्टरांनी सांगितले.त्यावर आमच्याकडे सध्या २ते ३ लाख असून आम्ही इतर पैशांची जुळवाजुळव करू पण आपण उपचार करावे अशी विनंती केली.पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने उपचार करण्यास नकार दिला.
त्याच दरम्यान तनिशा यांची प्रकृती अधिकच खालवली.त्यानंतर सुशांत भिसे यांनी पत्नी ला दुसर्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.पण यामध्ये जवळपास तीन तासाचा कालावधी गेला आणि त्या रुग्णालयात तनिशा यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.पण पुढील काही मिनिटामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.तनिशा यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळेत उपचार दिले असते.तर आज तनिशा या मुलीसोबत आणि कुटुंबियासोबत राहिल्या असत्या, त्यामुळे तनिशा यांच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.
त्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर म्हणाले,या घटनेसंदर्भात दीनानाथ रुग्णालयाकडून चौकशी केली जाणार आहे.या संदर्भातला अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.