शिवाजीनगर भागात भरदिवसा कोयते उगारुन दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दहशत माजविणाऱ्या सराइतांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली आहे. आमदार शिरोळे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
हेही वाचा >>> तरुण असे का वागतात? पुण्यात कोयता गॅंगच्या कहराच्या पार्श्वभूमीवर मानसोपचारतज्ज्ञांनी दिली ‘ही’ माहिती
६ जानेवारी रोजी जंगली महाराज रस्त्यावरील खाऊ गल्लीत खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या महिलेला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची घटना घडली होती. त्यानंतर ९ जानेवारी रोजी गोखलेनगर भागात टोळक्याने दहा वाहनांची तोडफोड केली. दुसऱ्या दिवशी जनवाडीत कोयते उगारुन टोळक्याने दहशत माजविली होती. बोपोडीतील चांदणी चौकात कोयते बाळगणाऱ्या दोन मुलांना पोलिसांनी पकडले होते. खडकी, बोपोडी भागात पोलीस चौकीतील पोलिसांकडून गस्त घालण्यात येत नसल्याने या भागातील गुन्हेगारी वाढीस लागली आहे, असे शिरोळे यांनी निवेदनात म्हटले आहे.