पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीया करीता विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या वॉर्डचे उदघाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आणि त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे वाद निर्माण झाला. या वादानंतर सुनील कांबळे यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना सदर प्रकार का घडला? आणि त्यांनी मारहाण का केली? याचे स्पष्टीकरण दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याबाबत भाजपा आमदार सुनील कांबळे म्हणाले की, मला त्याने तीनवेळा कोपरे मारले म्हणून मी पोलिसांना सांगितले की, हा कोण आहे? याकडे जरा बघा. तेव्हा पोलिसांनी त्याला मारलं, मी उलट त्याला सोडवायला गेलो होतो.

हे वाचा >> पोलिसाच्या कानशिलात लगावली, पुण्यातील भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचा प्रताप, वाचा नक्की काय झालं ते…

तसेच कार्यक्रम झाल्यानंतर मंचावरून खाली उतरत असताना आमदार कांबळे यांनी पोलिस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “मला माहीत नाही, तो कोण होता? मी खाली उतरत असताना माझ्या शर्टाला धरून खेचल्यामुळे मी त्याला धक्का दिला. सरकारी कार्यक्रमात कोणताही प्रोटोकॉल (राजशिष्टाचार) पाळला गेला नव्हता. मंचावर कोण आले, याचा कुणालाही काही पत्ता नव्हता. आमदारांना धक्काबुक्की होत होती. हे योग्य नाही. जाणूनबुजून आमदारांना धक्काबुक्की केली गेली.”

कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या कोनशिलेवर भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचं नाव नसल्याने ते नाराज होते. कार्यक्रम झाल्यावर सुनील कांबळे हे व्यासपीठावर खाली उतरत होते. त्यावेळी सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली. माध्यमांच्या कॅमेऱ्यातही ही घटना कैद झाली आहे. त्यानंतर सुनील कांबळे यांनी बाहेर येऊन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे नाराजी देखील व्यक्त केली.

आमदार सुनील कांबळे म्हणाले की, कोनशिलेवर माझं नाव नसल्याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, माझे नाव कोनशिला बसविणाऱ्या अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून काहीतरी चूक झाली. “मी या रागातून मी मारहाण केली नाही. माझे नाव नाही म्हणून मी मारहाण करेल, यात तथ्य नाही”, असेही आमदार कांबळे म्हणाले.

ती कानशिलात नव्हती…

पोलिसकर्मचाऱ्याला मारहाण केल्याबाबत स्पष्टीकरण देताना आमदार कांबले म्हणाले की, मी फक्त त्या व्यक्तिला ढकललं. मी कानशिलात मारली नाही. कानशिलात मारण्याचा प्रकार वेगळा असतो. माझे आयुष्य झोपडपट्टीत गेले आहे, कानशिलात कशी मारतात, हे मला चांगलं माहितीये.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla sunil kamble raction on police slaps in sasun hospital program in pune kvg