मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा आखला असताना उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध केला होता. त्यानंतर आज खासदार बृजभूषण सिंह पुण्यात आले आहेत. पुण्यात आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांना पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, “राज ठाकरे यांचा मी सैद्धांतिक मुद्यावर विरोध केला होता. त्यांच्याशी माझे वैयक्तिक वाद नाहीत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये कधीच दुरावा नव्हता. दोन्ही राज्यांचे आपसात प्रेम आहे. उत्तर प्रदेशमधील असंख्य लोक महाराष्ट्रात येऊन आपली उपजीविका भागवतात. माझाही कधी महाराष्ट्राला विरोध नव्हता.”
राज ठाकरे यांच्याशी माझी स्पर्धा नाही
२००८ ते २०११ पर्यंत महाराष्ट्रात अनेक आंदोलने झाली. त्यामध्ये उत्तरेतील बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश राज्यातील लोकांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठीच आम्ही राज ठाकरेंना विरोध केला होता. त्याशिवाय या विषयात फार काही नव्हते. पण मी तेव्हाही म्हणालो होतो आणि आजही सांगतो की, राज ठाकरेंच्या नावाचा काही लोकांनी गैरवापर केला. याची माहिती कदाचित त्यांना अजूनही नाही. राज ठाकरे आणि माझा काही राजकीय स्पर्धा नाही. ते महाराष्ट्राचे नेते आहेत. मी उत्तर प्रदेशमध्ये राहतो. आमच्यात संघर्ष निर्माण होण्याचा काहीही प्रश्न नाही.
राज ठाकरे पुन्हा अयोध्येत आल्यास..
राज ठाकरे हे जर पुन्हा अयोध्याला आले तर तुम्ही त्यांचे स्वागत करणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर बृजभूषण सिंह म्हणाले की, आतातरी मी कुस्तीसाठी आलो आहे. आज अयोध्या आणि राज ठाकरेंचे प्रकरण सुरु नाही. आज तरी मी कुस्तीचा प्रचार करण्यासाठी आलो आहे. कुस्ती आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मी आलो आहे.
तसेच महाराष्ट्रातील कुस्तीच्या वादाबद्दल खासदार बृजभूषण सिंह म्हणाले की, भारतीय कुस्ती संघाला कुणीही आव्हान देऊ शकत नाही. ज्या कुस्ती संघाचा मी अध्यक्ष आहे. त्या संघाला महाराष्ट्र कुस्ती संघाने मतदान केलेलं आहे. मी त्यांच्या सहमतीने निवडून आलेलो आहे. माझे मत आहे की, खेळात राजकारण न करता खेळाची प्रगती होईल, असा दृष्टीकोन ठेवला पाहीजे. जो खेळात राजकारण आणेल त्याला सर्वांनी मिळून विरोध केला पाहीजे.
शरद पवार यांचा मी आदर करतो. त्यांनी कुस्तीत योगदान दिले म्हणून नाही तर ते देशातील सर्वात जुने आणि अनुभवी राजकारणी आहेत. त्यांची मुलगी सुप्रिया सुळे मला भाऊ मानते. त्यांच्याशी माझे भावा-बहिणीचे नाते आहेत.