मुंबईतील नरेंद्र मोदी यांच्या महागर्जना यात्रेत सहभागी होण्यासाठी गाडय़ा उपलब्ध करून दिल्या नाहीत, परस्पर काहीतरी उद्योग केले, या कारणावरून सुरू झालेल्या धुसफुसीचा भडका बुधवारी पिंपरीत उडाला. कार्यकारिणी जाहीर करण्याच्या दिवशीच एका नवनियुक्त सरचिटणीसाला भोसरीतील वजनदार कार्यकर्त्यांने पैलवानी झटका दिल्याची घटना घडली. मुंडे-गडकरी समर्थकांमधील अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्त्यांची होणारी फरफट व घुसमटीतून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. अंतर्गत वादंगामुळे रखडलेली शहर कार्यकारिणी बुधवारी बैठकीत जाहीर करण्यात येणार होती. त्यासाठी सर्व पदाधिकारी जमत असतानाच हे दोघे कार्यालय असलेल्या इमारतीत समोरासमोर आले. तेव्हा, ‘नमस्कार मुंडेसाहेब’ असे म्हणत त्या सरचिटणीसाने या कार्यकर्त्यांस हिणवले, त्यातून दोघांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यावसन कार्यकर्त्यांने सरचिटणीसाला शिवीगाळ करून मारहाण केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यांच्यातील वादाला मोदींच्या सभेची पाश्र्वभूमी होती. माणसे नेण्यासाठी सतत मागणी करूनही गाडय़ा दिल्या नाहीत, खिल्ली उडवली होती, परस्पर उद्योग केले, या गोष्टींचा राग मनात असतानाच पुन्हा नेत्यांचे नाव घेऊन थट्टा केल्याने संतापलेल्या भोसरीवाल्याने सरचिटणीसाला धडा शिकवल्याचे सांगण्यात आले. या घटनेने बैठकीचा नूरच बदलला. दोन्ही गटातील वाद उफाळून आल्याने बैठक गुंडाळण्याची नामुष्की शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यावर ओढावली. १२१ जणांची जम्बो कार्यकारिणीची नावे पत्रकारांना द्यायची की नाही, यासाठी उशिरापर्यंत चालढकल सुरू होती. कार्यकारिणीत माऊली थोरात यांचा समावेश नव्हता, त्यांना कार्याध्यक्षपद देण्याचे मुंडे समर्थकांनी ठरवले होते. तथापि, माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी आक्षेप घेतला, काही आघाडय़ांनाही विरोध केला. त्यामुळे दोन्ही गटातील तणाव वाढला होता. अनपेक्षितपणे नाव कापलेल्या थोरात यांनी बराच थयथयाट केला. विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दोन्ही गटात ‘पॅचअप’ केले होते. मात्र, दोन्ही गटात पुन्हा चांगलेच बिनसले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा