पुणे : ‘बटेगे तो कटेंगे’ हे वास्तव असून, त्याला माझा पाठिंबा आहे. जम्मू काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित विभागले गेले आणि स्थलांतरित झाले. जाती-जातींमध्ये लोक विभागले गेले, की त्याचा फायदा इतरांना होत असतो. या शब्दाचा अर्थ प्रत्येक जण आपल्या पद्धतीने घेत असतो, असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तावडे यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केले. या वेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते. तावडे म्हणाले, की विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. राज्यात दौरा करत असताना सामान्य मतदाराची भावना समजून घेतली, तर या निवडणुकीत महायुती स्पष्ट बहुमत पलीकडे जाईल, असे चित्र आहे. लोकसभेला महायुतीच्या जागा कमी आल्या. त्यामुळे अनेकांच्या मनात विविध कल्पना निर्माण झाल्या आहेत. मात्र, विधानसभेसाठी अनेक पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने मतांचे विभाजन होऊन युतीला चांगल्या जागा मिळतील.

हेही वाचा – पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा

मराठा आरक्षणाबाबत बोलताना तावडे म्हणाले, की मराठा समाजाच्या प्रश्नावर कोणी आंदोलन केले, तर ते चांगलेच आहे. यशवंतराव चव्हाण यांनी पहिल्यांदा आरक्षण दिले. त्यानंतर याबाबत विविध मागण्या वेळोवेळी समोर आल्या. मंडल आयोगाच्या माध्यमातून देखील आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. आम्ही सत्तेत असताना मराठा आरक्षण दिले आणि उच्च न्यायालयात ते टिकवून दाखवले, तरी मराठा नेते मनोज जरांगे भाजपला दोष देत आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर, हिंदुत्व आणि कलम ३७० याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षासोबत जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. जातनिहाय जनगणना करून लोकसंख्या टक्केवारीनुसार आरक्षण देण्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी सांगत आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, असेही विनोद तावडे म्हणाले.

हेही वाचा – ‘मावळ पॅटर्न’चे काय होणार?

सभेच्या ठिकाणी पाऊस पडल्यास जिंकण्याचा भ्रम

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभेचे नियोजन करणारी व्यक्ती उद्या पाऊस कुठे आहे, हे पाहून त्यांच्या सभेचे आयोजन करते, अशी खोचक टीका तावडे यांनी केली. त्यांच्या सभा ज्या ठिकाणी होतात तिथे पाऊस पडल्यावर जागा जिंकता येतात हा भ्रम आहे. साताऱ्यामधील लोकसभेची जागा आम्ही जिंकली नाही, तरी विधानसभेची जिंकली आहे, असा टोला तावडे यांनी लगावला.

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये नसल्याचे सांगत माझ्यासाठी राष्ट्र प्रथम असून, आता मी केंद्रीय स्तरावर काम करत आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत दिल्लीमध्ये निवडणूक निकालानंतर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp national general secretary vinod tawde pune comment on maratha reservation and mahayuti pune print news ccm 82 ssb