महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळावी, या हेतूने पिंपरी पालिकेने सुरू केलेल्या मात्र, सत्ताधाऱ्यांमधील वादामुळे दरवर्षी वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या ‘पवनाथडी जत्रे’चा यंदाचा ‘सांगवी की पिंपरी’ या वादावर ‘कारभारी’ अजित पवार यांनी तोडगा काढला. ‘सांगवीकर’ असलेले स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे सांगवीसाठी कमालीचे आग्रही होते. मात्र, पवनाथडी तेथे झाल्यास पूर्ण श्रेय भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांना मिळेल म्हणूनच राष्ट्रवादीने शितोळेंचा हिरमोड करत पिंपरीवर शिक्कामोर्तब केले.
महिला बालकल्याण समितीने पिंपरीत पवनाथडी घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. तथापि, खर्चास मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत आल्यानंतर अध्यक्ष शितोळे यांनी सलग तीन आठवडे हा प्रस्ताव तहकूब ठेवला. दोन्ही समित्यांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे ‘सावळा गोंधळ’ झाला होता. त्यातच, अ, ब, क, ड, ई आणि फ या सहाही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत स्वतंत्रपणे पवनाथडी आयोजित करण्याचा विचार पुढे आणण्यात आला. मात्र, त्यावर कोणताही ठोस निर्णय झाला नाही. एका पवनाथडीसाठी ५० लाखाचा खर्च होतो. सहा ठिकाणी झाल्यास होणारा खर्च पालिकेला परवडणारा नाही, या मुद्दय़ावरून तो प्रस्ताव निकाली काढण्यात आला. मात्र, ‘सांगवी-पिंपरी’चा तिढा कायम राहिला. सलग तिसऱ्या वर्षी सांगवीत पवनाथडी नको, अशी सूचना अजितदादांनी केली. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनाही सांगवीत पवनाथडी घेतल्यास आमदार जगतापांना श्रेय मिळेल, अशी धास्ती होतीच. या विषयात महापौरांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलीच नाही. शितोळेही एकटे पडले. अखेर, पिंपरीवर शिक्कामोर्तब झाले. या संदर्भात, शितोळे म्हणाले, सलग दोन वर्षे सांगवीत पवनाथडी झाली होती. त्यामुळे यंदा पिंपरीत घेण्याचा निर्णय झाला. आपण फार ताणून धरले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ncp bhimthadi credit