पिंपरी : भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही मावळमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे बंडखोर बापू भेगडे यांचा प्रचार करण्याची ठाम भूमिका घेतली. त्यामुळे फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी झाली नसून मावळमध्ये महायुतीत बिघाडी कायम आहे. या ‘मावळ पॅटर्न’मुळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्या अडचणीत भर पडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला हाेता. मावळच्या जागेसाठी माजी आमदार बाळा भेगडे तीव्र आग्रही हाेते. मावळ भाजप आणि आमदार शेळके यांचे टोकाचे राजकीय मतभेद आहेत. दोन महिन्यांपूर्वीच सुनील शेळके यांचे काम करणार नसल्याचा ठरावही मावळ भाजपने केला हाेता. असे असतानाही मावळची जागा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला मिळाली. विद्यमान आमदार सुनील शेळके यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने या पक्षात बंडखोरी झाली. उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादीचे (अजित पवार) तत्कालीन प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी बंडखोरी केली. भेगडे यांना मावळ भाजपसह महाविकास आघाडी, मनसेने जाहीर पाठिंबा देत ‘मावळ पॅटर्न’ उदयास आणला. भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी प्रदेश उपाध्यक्षपदाचा तर गणेश भेगडे यांनी किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

हेही वाचा >>>‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्याचा लघुपट ऑस्करच्या स्पर्धेत

भाजपचे मावळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष हे अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. बापू यांच्यासाठी बाळा भेगडे हे सर्वपक्षीय पाठिंबा मिळवत आहेत. भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळा भेगडे यांच्यासह मावळ भाजपमधील पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. भेगडे यांना मुंबईलाही पाचारण करण्यात आले हाेते. परंतु, ताेडगा निघाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने दबावतंत्राचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला. नाना काटे यांनी चिंचवडमधून अपक्ष अर्ज दाखल केला हाेता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ भाजप पदाधिकारी सक्रिय होण्याचे आणि जाहीर सभा घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आपण माघार घेतल्याचे काटे यांनी जाहीर केले. परंतु, भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे हे बापू भेगडे यांचा प्रचार करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे ‘मावळ पॅटर्न’ ला भाजपने दिलेला पाठिंबा मागे घेतल्याने आपण माघार घेतल्याचा काटे यांचा दावा फाेल ठरला. ज्यांनी राजीनामे दिले आहेत, त्यांची हमी मी घेऊ शकत नाही. जे पक्षात आहेत, ते महायुतीचे काम करतील. शेळके आणि मावळ भाजपमधील पदाधिकाऱ्यांमध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, राजीनामा दिलेले पदाधिकारी आणि आमदार शेळके यांची व्यक्तिगत दुश्मनी असल्याचे सांगत फडणवीसही हतबल झाले.

याबाबत भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे म्हणाले, की मावळची लढाई ही प्रवृत्तीच्या विराेधात आहे. गेल्या पाच वर्षांत मावळातील सर्व पक्ष, कार्यकर्त्यांचे विचार संपविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि जनता बापू भेगडे यांच्या पाठीशी आहे. चिंचवडला त्यांनी त्यांची भूमिका सांगितली. आम्ही ‘मावळ पॅटर्न’च्या भूमिकेवर ठाम आहोत. आमची लढाई स्थानिक पातळीवरील विषयांवर आहे. भाजपच्या पदांचा राजीनामा देऊन आम्ही कामाला लागलाे आहाेत. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे प्रचारासाठी आले तरी आम्ही आमची भूमिका पार पाडणार आहाेत. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही बापू भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही सर्व जण एकत्र का आलाे, हे राज्याने जाणून घेण्याची आवश्यकता आहे.

बापू भेगडे यांना ‘ ट्रम्पेट’ चिन्ह

अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना ट्रम्पेट चिन्ह मिळाले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मावळमध्ये तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह मतदान यंत्रावर राहणार नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp office bearers in maval asserted their position to campaign for bapu bhegde of ncp ajit pawar party pune print news ggy 03 amy