बहुचर्चित ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटाला भाजपने विरोध दर्शवला आहे. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ‘सिटीप्राईड’ चित्रपटगृहातील ‘बाजीराव-मस्तानी’चे आजचे सर्व खेळ रद्द करावे लागले आहेत. चित्रपटातील गाण्यांमुळे ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच वादाच्या भोवऱयात सापडला होता. भाजपच्या पुण्यातील कोथरुड शाखेने ‘सिटीप्राईड’ चित्रपटगृहाच्या मालकांना ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट प्रदर्शित केल्यास होणाऱया नुकसानाची जबाबदारी चित्रपटगृह मालक आणि संचालकांची असेल, असा धमकीवजा इशारा दिला होता. त्यानंतर आज सकाळी ‘बाजीराव-मस्तानी’चा सकाळी ८ वाजताचा खेळ सुरू होण्याआधी ‘सिटीप्राईड’ चित्रपटगृहाबाहेर भाजप कार्यकर्ते जमा झाले आणि चित्रपटाच्या विरोधात निदर्शने करण्यास सुरूवात केली. भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने चित्रपटगृहाने ‘बाजीराव-मस्तानी’चे आजचे सर्व खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.
भाजप कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाच्या परिसरात लावण्यात आलेले चित्रपटाचे पोस्टर्स देखील काढून टाकले. या चित्रपटातून भारतीय इतिहासाचे विकृतीकरण केल्याने तो प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे. ‘सिटीप्राईड’प्रमाणेच इतर चित्रपटगृहांबाहेर देखील या चित्रपटाविरोधात आंदोलन करणार असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
चित्रपटात मस्तानी आणि काशीबाई यांना एका गाण्यात एकत्र नाचताना दाखविण्यात आल्याने विरोधाचा ‘पिंगा’ सुरू आहे. त्यानंतर चित्रपटातील ‘मल्हारी’ गाण्यात बाजीराव यांना नाचताना दाखविण्यात आल्याने हा विरोध आणखी वाढला.
Take Our Poll
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा