शिवसेनेसोबत २५ वर्षांपासून असलेली पारंपरिक युती तुटली आणि विधानसभेपाठोपाठ कल्याण-डोंबिवलीसाठी स्वतंत्रपणे निवडणुका लढल्यानंतर भाजपच्या जागा वाढल्या, आता तोच ‘फॉम्र्युला’ पुणे, पिंपरीसह महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांमध्ये वापरण्याचे सूतोवाच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. तेव्हाच, पक्षातील नव्या-जुन्या वादाच्या पाश्र्वभूमीवर, ग्रामीण ढंगात आणि खुमासदार शैलीत कबूतर आणि गरुडाची गोष्ट सांगून ‘झेप’ घेऊ शकणाऱ्या कार्यकर्त्यांला ताकद देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
पुण्यात रविवारी काही कामानिमित्त दानवे आले असता, त्यांनी पुणे, पिंपरीतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले.
जबाबदारी घेणारा कार्यकर्ताच मोठा होतो, असे सांगून ‘पंचायत समिती ते प्रदेशाध्यक्ष व्हाया केंद्रीय मंत्री’ हा स्वत:चा प्रवास त्यांनी सांगितला. मोदी लाट तसेच केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपमध्ये येणाऱ्यांचा ओघ वाढला आणि हळूहळू पक्षात नवा आणि जुना, असा सुप्त संघर्ष सुरू झाला.
पक्षात एखादा नवीन कार्यकर्ता आला की त्याचे स्वागत करण्याऐवजी नाके मुरडली जातात, त्याला पद देण्याची वेळ आल्यास जुन्या कार्यकर्त्यांकडून तक्रारी केल्या जातात. या वादाच्या पाश्र्वभूमीवर, दानवे यांनी गरूड आणि कबूतराची गोष्ट सांगून आपला मुद्दा पटवून दिला. ते म्हणाले, गरूड आणि कबूतर या दोन्ही पक्ष्यांना पंख असतात. उंच झेप घेण्याची ताकद कबूतरापेक्षा गरुडात जास्त असते. पक्षाचे पद हे कबूतराला दिल्यास ओझ्याखाली ते दबून जाईल. मात्र, गरुडाला दिल्यास तो उंच उंच झेप घेऊ शकेल. गरुडाची झेप घेण्याची ताकद असलेला कार्यकर्ता ओळखून त्याला पद दिले पाहिजे, त्याची ताकद वाढवली पाहिजे.
आगामी निवडणुकींसाठी ताकदीने उतरावे लागणार आहे, त्या दृष्टीने पदांचे वाटप झाले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा