शहराध्यक्ष म्हणतात – योगेश गोगावले, भाजप
भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना उमेदवारी मिळणार का?
भारतीय जनता पक्षाकडे येणाऱ्यांचा ओघ मोठा आहे. पक्षाला जनसमर्थन आहे. त्यातूनच कार्यकर्त्यांचे मोठय़ा प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत. पक्ष वाढावा, संघटन मजबूत व्हावे, हाच यामागील हेतू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही विद्यमान नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला असला तरी त्यांच्यासह इतर पक्षांमधून आलेले कार्यकर्ते अशा सर्वानाच उमेदवारी मिळेल असे नाही. पक्षाच्या, संघटनेच्या रचनेत जे बसतील त्यांचा विचार केला जाईल.
प्रवेशामुळे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले आहेत का?
नाही. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाल्यामुळे भाजपचा जनाधार वाढला आहे. पक्षप्रवेश होत असले तरी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावलेले नाहीत. उमेदवारीचे पर्यायही आमच्याकडे मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यांचाही विचार निश्चितच होईल. मात्र ते सारे तिकिटासाठी सुरू आहे, असे नाही.
गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्यांना प्रवेश दिल्याचा फटका बसणार का?
भाजपचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी आहे. समाजात भिन्न-भिन्न प्रवृत्तीची माणसे असतात. भाजपशी संपर्क साधण्यापूर्वी ते अन्य कुठल्या तरी पक्षाशी किंवा राजकारणाशी संबंधित होते. काही चुका आमच्याकडून झाल्या असतील. मात्र त्यातून आम्ही सुधारणा केली आहे. भविष्यातही आम्ही त्याबाबत सावधान राहणार आहोत.
पार्टी विथ दि रेफरन्स ही ओळख?
पक्षात कुठलीही अंतर्गत गटबाजी नाही. मुलाखतींना भरघोस प्रतिसाद मिळाला. आठशेहून अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीसाठीच्या कार्ड कमिटीमध्ये सर्वाचाच समावेश होता. पक्षात आजही सामूहिक निर्णय घेतले जातात.
शिवसेनेबरोबर युती होणार का?
समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची आमची भूमिका आहे. शिवसेनेकडून स्वबळाची भाषा केली जात असली तरी युतीबाबत आम्ही आग्रही आहोत. पक्षातील काही कार्यकर्त्यांची स्वतंत्र लढावे, अशी इच्छा आहे. मात्र राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन युतीसाठी आम्ही आग्रही राहू. त्याबाबत दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये प्राथमिक स्तरावरील चर्चेला सुरुवात होईल. यापूर्वी काय घडले यावर बोलून संदिग्धता निर्माण करणे चुकीचे होईल.
प्रचारातील मुद्दे काय राहतील?
शहराचा विकास हाच प्रमुख मुद्दा असेल, यात शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या काळात शहर विकासाचे, नागरी हिताचे अनेक विषय प्रलंबित राहिले. विकास आराखडा करताना त्यांनी जनहिताची आरक्षणे उठविली. त्याउलट अडीच वर्षांच्या कालावधीत आम्ही बहुतांश प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. शहर विकासावर निवडणूक लढवू.
तयारी कशी सुरू आहे?
तीन ते चार महिन्यांपासूनच पक्षाची ही प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी बैठका घेण्यात आल्या. प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर त्याअंतर्गत बूथ रचना, त्यावरील कार्यकर्त्यांची यादी, अभ्यास मेळावे झाले आहेत. या पुढील काळात प्रमुख संस्था, नागरिक यांच्या भेटी-गाठी घेण्यावर भर राहील. प्रभागांचा प्रारूप जाहीरनामा आणि शहराचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येईल. कार्यकर्त्यांनाही सातत्याने मार्गदर्शन करण्यात येत असून बूथवर काम करण्याची संधी कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. राजकीय परिवर्तन होईल का?
आगामी निवडणूक ही वेगळी राहणार आहे. मतदारांच्या मनात पक्षासाठी जागा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीची शहर विकास आणि नियोजनाबाबतची उदासीनता सर्वानी अनुभवली आहे. त्यामुळे केवळ राजकीय परिवर्तन नव्हे तर व्यवस्थेचेही परिवर्तन या निमित्ताने निश्चित होईल.
मुलाखत- अविनाश कवठेकर