महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यात एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. स्वप्नील लोणकर नावाच्या या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर नियुक्त्यांबाबत प्रकरण उजेडात आलं. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला होता. या प्रकरणावरून एमपीएससीचे इतर परीक्षार्थी आणि विरोधकांनीही राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं. स्वप्निलने आत्महत्येपूर्वीच्या पत्रात आपल्यावर कर्जाचा डोंगर असल्याचे म्हटले होते. त्यावर आता भाजपाने स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांच्या १९.९६ लाखांच्या थकित कर्जाची परतफेड केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या १९ लाख ९६ हजार ९६५ रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते धनादेश लोणकर कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. स्वप्निल लोणकरचे वडिल सुनील तात्याबा लोणकर यांना हा कर्जाच्या रकमेचा धनादेश देण्यात आला. शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचे लोणकर कुटुंबीयांवर कर्ज होते. आधीच स्वप्निलची आत्महत्या, त्यातून घरातील प्रिटींग प्रेस बंद आणि अशात पतसंस्थेकडून कर्जाचा तगादा लागल्यामुळे हे कुटुंब त्रस्त झाले होते. अखेर या कर्जाची रक्कम लोणकर कुटुंबीयांना भाजपाच्या वतीने देऊन त्यांना दिलासा देण्यात आला. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, गोपीचंद पडाळकर, मंगेश चव्हाण आणि इतरही नेते उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp repaid rs 20 lakh debt of swapnil lonakar family abn