पुणे : कल्याण-डोंबिवली लोकसभेच्या जागेवर भारतीय जनता पक्षाने दावा केल्याची मला माहिती नाही. मात्र यापुढील सर्व निवडणुका भाजप-शिवसेना युती म्हणून लढविणार आहे. भाजप नेते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी तसे जाहीर केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

हेही वाचा : Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आजही निर्णय नाहीच; महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

हेही वाचा : वनसेवा मुख्य परीक्षा २०२१ आता ३ ऑक्टोबरला

एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह काही प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांना भेट दिली. अभिनेता नाना पाटेकर यांच्या डोणजे येथील निवासस्थानी जाऊन गणेश दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. भाजपच्या ताब्यात नसलेल्या पण पक्षाला अनुकूल असलेल्या आणि शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला असलेला कल्याण लोकसभा मतदार संघांत कमळ फुलविण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाने केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत कल्याण-डोंबिवली मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. भाजपने या जागेवर दावा केल्याबाबत एकनाथ शिंदे यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी त्याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यानंतर पित्रृपंधरवडा आणि त्यानंतर नवरात्र आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याबाबतचा निर्णय नंतर घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तर सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाकडून शिवसेनेचे चिन्ह गोठविण्यासंदर्भात केलेल्या मागणीबाबाबत हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने बोलता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, निर्बंधमुक्त वातावरणामुळे गणेशोत्सवात सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. गणेशोत्सव राज्यात धुमधडाक्यात साजरा होत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र नियमांचे पालन करावे. उत्सवाला गालबोट लागू नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी मानाच्या गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर केले.  आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शिवसेना (शिंदे गट) संपर्क प्रमुख अजय भोसले, शहरप्रमुख नाना भानगिरे, किरण साळी उपस्थित होते.  राज्यातील इडा पीडा टळू दे, राज्यातील सर्व आरिष्ट दूर होऊ दे, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे असे साकडे गणरायाला घातल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Story img Loader