|| बाळासाहेब जवळकर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड शहरात येऊन भाजपच्या लोकसभा प्रचार मोहिमेचा प्रारंभ केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कामगार परिषदेच्या निमित्ताने वातावरणनिर्मिती केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कर्जतला सभा झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ मावळातून लढू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. अशा विविध घडामोडींमुळे मावळ लोकसभेची लढत आतापासूनच रंगतदार झाली आहे.

मावळ लोकसभेच्या रिंगणात आतापासूनच कमालीची रंगत निर्माण झाली आहे. मावळातून सलग दोन वेळा शिवसेनेचा खासदार निवडून आला. दोन्ही वेळी शिवसेनेची भाजपशी युती होती. सद्य:स्थितीत भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शनिवारी झालेला पिंपरी-चिंचवडचा दौरा मावळ तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघाची भाजपच्या दृष्टीने चाचपणी करण्यासाठीच होता. भाजप विचारांचेच खासदार येथून निवडून येतील, असे सांगत शिवसेनेला जो काही संदेश द्यायचा होता, तो फडणवीस यांनी दिला. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे अनेक मंत्री, आमदार-खासदारांसह हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या अटल संकल्प महामेळाव्याच्या निमित्ताने भाजपने शहरात जोरदार वातावरणनिर्मिती केली.

त्याच दिवशी (शनिवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील शहरातच होते. उद्योगनगरीतील कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी आयोजित कामगार परिषदेसाठी ते रहाटणीत आले होते. मुख्यमंत्री भाषणात जेव्हा शिवसेनेला उद्देशून आव्हानाची भाषा करत होते, त्याच वेळी शिवसेनेचे दोन्हीही खासदार शरद पवार यांच्यासमवेत व्यासपीठावर होते. ही परिषद सर्वपक्षीय असली तरी राष्ट्रवादीचे पदाधिकारीच मुख्य आयोजक होते. त्यामुळे निवडणुकांच्या दृष्टीने तयारीचा भाग म्हणूनही या परिषदेकडे पाहिले गेले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजगुरुनगर आणि कर्जतला सभा घेत मावळ, शिरूरसाठी शिवसेनेने शड्डू ठोकल्याचा संदेश भाजपला दिलेला आहे.

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे मोठे कार्यक्रम शहरात असताना अजित पवार यांनी त्याच दिवशी शहरात पत्रकार परिषद घेतली आणि केंद्र, राज्य तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारावरून भाजपवर हल्ला चढवला. केवळ दबाव निर्माण करण्यासाठी भाजपने शिवसेनेच्या मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा घेतल्याचे मत या वेळी त्यांनी व्यक्त केले. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाची महाआघाडी होणार असल्याची खात्री देत अजित पवार यांनी मावळ, शिरूर राष्ट्रवादीच्या वाटणीला मिळेल आणि त्या दोन्ही जागाजिंकून दाखवू, असा विश्वास  व्यक्त करतानाच भाजपच्या नियोजित उमेदवारांपेक्षा ताकदीचे उमेदवार आमच्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. पार्थ पवार यांच्या उमेदवारीच्या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन पाळले. वास्तविक पाहता पार्थसाठी मावळात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या स्थानिक इच्छुक नेत्यांनी वातावरणनिर्मिती आणि जुळवाजुळव करावी आणि ऐनवेळी उमेदवार म्हणून श्रेष्ठींकडून पार्थचे नाव आणले जाईल, अशी रणनीती असू शकते, असे राष्ट्रवादीच्या गोटातूनच सांगितले जाते. अशा घडामोडींमुळेच मावळातील वातावरण तापू लागले आहे. तुलनेने शिरूर प्रांतात शांतता आहे.

स्मार्ट सिटी कचऱ्यात, पाणीपुरवठय़ाचे तीन तेरा

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता हातातून गेल्याचे शल्य अजित पवार यांच्या मनातून काही केल्या जात नसल्याचे शनिवारी पुन्हा एकदा दिसून आले. मला शहरवासीयांनी नाकारले, मी आता शहरात पाहणार नाही. ज्यांच्या हातात सत्ता दिली, तेच काय ते पाहतील, असे स्पष्ट करून शहरातील समस्यांची जंत्रीच पवार यांनी पिंपरीत बोलताना मांडली. नागपूरप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पोलीस आयुक्तालयाचा काही उपयोग होताना दिसत नाही. अपुरे पोलीस कर्मचारी असून आवश्यक सोयीसुविधांचा अभाव आहे. तोडफोड, जाळपोळीचे उद्योग सुरूच आहेत. राजकीय हस्तक्षेपाने पोलिसांचे हात बांधले जात आहेत. राष्ट्रवादीने सुंदर शहर, स्वच्छ शहर म्हणून नावलौकिक मिळवला. भाजपने कचऱ्याचे साम्राज्य निर्माण केले. निविदांच्या अर्थकारणात सर्व जण गुंतले आहेत. पाणीपुरवठा विस्कळीत आहे. अतिरिक्त पाणी कोटा मंजूर असूनही काही करता आले नाही. पवना बंद नळ योजनेचा विषय तसाच आहे. मेट्रो अर्धवट असून संथगतीने काम सुरू आहे. स्वस्तातील गृहप्रकल्प योजना रखडल्या आहेत. बांधकाम परवानगी अडवण्यामागे वेगळेच अर्थकारण आहे. महापालिका आयुक्त हतबल आहेत. शहरातील आमदार-खासदार निष्क्रिय ठरले असून, शहर विकासापेक्षा स्वविकासाकडे त्यांचे लक्ष आहे. आमदारांनी शहराची दोन भागांत विभागणी करून घेतली आहे. पालकमंत्री लक्ष घालत नाहीत. मुख्यमंत्री रिमोटवरच उद्घाटने करतात. शहराला कोणी वाली नसल्यासारखे चित्र आहे.  सत्ताधाऱ्यांना कोणतेच प्रश्न सोडवता आले नाहीत, असा चौफेर हल्ला पवार यांनी चढवला. यापूर्वी  १५ वर्षे राष्ट्रवादीकडेच पिंपरी महापालिकेची सत्ता होती, तेव्हा अजित पवार यांच्या बगलबच्च्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला. नको नको ते उद्योग केले. म्हणूनच शहरवासीयांनी राष्ट्रवादीला बाहेरचा रस्ता दाखवला, हे अजित पवार सोयीस्करपणे विसरले असावेत. सध्या राष्ट्रवादीच्या पावलावर पाऊल टाकून शहर भाजपचा कारभार सुरू आहे.

balasaheb.javalkar@expressindia.com