पिंपरी : राज्यातील समीकरणे बदलली असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेत इच्छुकांमध्ये आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपा-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जागा वाटपावरून बिघाडी होण्याची शक्यता आहे. तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढल्यास बंडखोरीची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांनी २०१७ मध्ये अजित पवार यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. पालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आणली. शहरात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष प्रबळ असून एकमेकांचे विरोधक आहेत. २०१७ मध्ये या दोन पक्षांनी १२८ जागांवर निवडणूक लढविली होती. भाजपाचे ७७, राष्ट्रवादीचे ३६, शिवसेना नऊ, अपक्ष पाच आणि मनसे एक असे संख्याबळ होते. आता राज्यातील समीकरणे बदलली आहेत. अजित पवार हे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांत विभागली असली तरी, पिंपरी-चिंचवडची संपूर्ण राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटात सहभागी झाली आहे. त्यामुळे शहरातील दोन प्रमुख पक्ष एकत्र आल्याने महापालिका इच्छुकांची कोंडी झाली आहे.

हेही वाचा – कुरुलकरांनी पाकिस्तानी गुप्तहेराला क्षेपणास्त्रांची माहिती दिल्याचे उघड, दोषारोपपत्रात धक्कादायक उल्लेख

खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेना शिंदे गटात असल्याने शिंदे गटदेखील जास्त जागांचा आग्रह धरण्याची शक्यता आहे. पालिकेवर मागील पाच वर्षे भाजपाने एकहाती राज्य केले. अजित पवार यांच्या गटालाही एकहाती सत्ता हवी आहे. शिवसेना शिंदे गटाची शहरात तेवढी ताकद नाही. भाजपा-अजित पवार गट एकत्रित लढल्यास बंडखोरी अटळ आहे. त्यामुळे स्वबळावर मैत्रिपूर्ण लढती होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भाजपाचे ७७ नगरसेवक होते. त्यामुळे त्या जागा कमी होणार नाहीत. उर्वरित जागांचे वाटप होईल. भाजपाचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील. भाजपाचाच महापौर होईल. त्यासाठी अजित पवार यांचे पाठबळ मिळेल. – अमोल थोरात, सरचिटणीस, भाजपा

हेही वाचा – पुणे : राज्यातील दहा तंत्रशिक्षण संस्थांमध्ये उत्कृष्टता केंद्र, ५३ कोटींचा निधी मंजूर 

राज्यातील नवीन समीकरणामुळे वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल त्याची अंमलबजावणी केली जाईल. पक्षाने निवडणुकीची पूर्णतयारी केली आहे. निवडणूक कधीही जाहीर झाल्यास आम्ही निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहोत. – अजित गव्हाणे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

महाविकास आघाडीतील नेते जो निर्णय घेतील. तो आम्हाला मान्य राहील. महाविकास आघाडी आजही एकत्रित आहे. ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आम्ही एकत्रित महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. – ॲड. सचिन भोसले, शहरप्रमुख, ठाकरे गट

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp shiv sena shinde group ncp ajit pawar group is likely to have a breakdown over seat allocation for the pimpri chinchwad mnc elections pune print news ggy 03 ssb