पुणे : भाजपचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर होईल, या शक्यतेने भिमाले यांनी महापालिकेकडे ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची मागणी केली आहे. त्यामुळे आमदार मिसाळ यांची धाकधूक वाढणार आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघातून मिसाळ सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांना स्वपक्षाचे माजी नगरसेवक भिमाले यांनी आव्हान दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून भिमाले यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असून, ते उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात. लोकसभा निवडणुकीनंतर भिमाले यांनी समाजमाध्यमात ‘लढणार आणि जिंकणार’ अशी पोस्ट केली होती. त्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात रंगली होती. त्यानंतर आता उमेदवारी मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांनी महापालिकेकडे अर्ज केला आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला स्थानिक स्वराज्य संस्थेचा कोणताही कर थकीत नसल्याचे प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. त्यानुसार, भिमाले यांनी कागदांची जुळवाजुळव केल्याने त्यांना पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा – इंदापूरमधील नाराज निवडणूक लढविण्यावर ठाम, ‘उमेदवार बदलण्याचा फेरविचार न केल्यास बंडखोरी परवडणार नाही’

हेही वाचा – महसूलमंत्र्यांच्या वरदहस्ताने पुनर्वसनाच्या जमिनीमध्ये २०० कोटींचा घोटाळा – आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप

भिमाले गेल्या ३० वर्षांपासून राजकीय जीवनात सक्रिय आहेत. मार्केट यार्ड परिसरात तीन वेळा नगरसेवक आणि महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर काही काळ त्यांनी सभागृहनेता म्हणून काम पाहिले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पर्वती मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाले होते. त्या वेळी त्यांच्याकडे पुणे लोकसभा समन्वयक अशी जबाबदारी होती. सन २००९, २०१४ आणि २०१९ या तिन्ही निवडणुकांमध्ये भिमाले पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, पक्षाच्या आदेशामुळे त्यांनी तिन्ही वेळा माघार घेतली होती. या वेळी मात्र पर्वतीमधून निवडणूक लढवायचीच, असा चंग भिमाले यांनी बांधला आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली असून, त्या दृष्टीने महापालिकेकडे ‘ना हरकत’ प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचे भिमाले यांनी सांगितले.