लोणावळा : भाजपचे काही विद्यमान आमदार आणि खासदार काँग्रेस सोबत असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ज्यावेळी आम्ही हातोडा मारू तेव्हा तुम्हाला दिसेलच असं त्यांनी म्हटलं आहे. नाना पटोले हे लोणावळ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबईत लोकसभेच्या तीन जागा मागितल्या असल्याचा त्यांनी उल्लेख केला असून जागा वाटपाचा विषय लवकरच संपवणार आहोत. असे देखील त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, लोणावळ्यातील काँग्रेसच्या शिबिरात सात आमदार गैरहजर होते. याबाबत देखील त्यांनी खुलासा केला आहे.
नाना पटोले म्हणाले, काही वैयक्तिक कारणामुळे लोणावळ्यातील शिबिरात काही आमदार येऊ शकले नाहीत. गैरहजर असलेल्या आमदारांची संख्या सात आहे. गैरहजर पदाधिकारी आणि आमदार यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार आहोत. सध्या काँग्रेस पक्षातून भाजपात काही जण जाणार असल्याची शक्यता असल्याचा प्रश्न पत्रकरांनी विचारल्यानंतर, पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षाला कोण येतंय आणि कोण जातंय याने फरक पडत नाही. नवीन मतदार हे राहुल गांधींचे चाहते आहेत. तरुणांचे आयुष्य मोदींनी उध्वस्त केलं. त्यामुळे ही तरुण पिढी महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचे ठाम मत पटोले यांनी व्यक्त केले.
आणखी वाचा-प्रॉपर्टीचा ऑनलाइन शोध घेताना आधार, थंब इम्प्रेशन होणार गायब
पुढे ते म्हणाले, काँग्रेस पक्षाचा आगामी लोकसभेसाठी सर्व्हे सुरू झाला आहे. आम्ही जिंकणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी देणार आहोत. मेरीटच्या आधारे निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रात भाजप दोन जातीत भांडण लावून देत आहे. समाजात तेढ निर्माण करत आहे. शाहू फुलेंचा विचार संपवण्याचे पाप याच भाजपने केलं आहे. यांची सत्तेची मस्ती ही जनताच उतरवेल. त्यांना जनता माफ करणार नाही. अस स्पष्ट पणे नाना पटोले यांनी सांगितलं.