पिंपरी : आतापर्यंत आपण राज्यात पूर्ण बहुमताने सत्तेत कधीच आलो नाहीत. १२४ च्या पुढे गेलो नाहीत. गुजरात, राजस्थानमध्ये पूर्ण बहुमताने भाजप सत्तेत येते. महाराष्ट्रात एकहाती सत्ता येत नाही, याची खंत वाटते. यावर्षीचा महाविजय करण्यासाठी झपाटून काम करा. यावेळेसचा महाविजय झाल्यास १५ वर्षे महाराष्ट्रात भाजपची सत्ता येईल. १५ वर्षे भाजप सत्तेतून हटणार नाही, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणूक प्रमुखांची चांगलीच हजेरी घेतली. पिंपरीत विधानसभा मतदारसंघात अमित गोरखे, आमदार उमा खापरे राहत आहेत. या मतदारसंघात केवळ दोन हजार घरांचे समर्थन मिळाले आहे.
चिंचवडमध्ये केवळ तीन, पिंपरीत १५ आणि मावळमध्ये १७ लोकांनी लोकांनी मन की बात बघितली. मग कसा व्हायचा महाविजय असा सवालही त्यांनी केला. अर्धे बूथ प्रमुख फोन उचलत नाही. निम्मे पन्नाप्रमुख गायब आहेत. खासदार, आमदार, नगरसेवक, अध्यक्ष, महिला अध्यक्ष कोण होणार याच्यातच आपल्याला रस असतो. त्याची चर्चा केली जाते. पण, गुजरात येथे भाजपकडून कोण खासदार, आमदार होणार हे कोणालाच माहिती नसते. पक्षाचे केलेले काम जो सरल उपयोजनवर (अॅप) पाठवेल, ६०० घरी जाईल. त्यालाच महापालिकेची उमेदवारी मिळेल. आजपासून गटबाजीचे राजकारण संपवून टाका, नेत्यांनी गटबाजी संपवली तरच महाविजय पूर्ण होईल. पिंपरी-चिंचवड मधील एकही मत दुसरीकडे गेला नाही पाहिजे. १३ महिने दररोज तीन तास काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर पुन्हा ब्लॉक;या वेळेत राहणार वाहतूक बंद
काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की राहुल गांधी चांगले व्यक्ती नाहीत. ज्याला भाषण येत नाही तो सत्तेत येऊ शकत नाही. त्यामुळे २०४७ पर्यंत राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाहीत. आपल्याकडे नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस ते अमित गोरखे यांच्यापर्यंत अशी किती लांब रांग आहे, असेही ते म्हणाले.