‘पक्षादेश आल्यास कोणत्याही मतदारसंघातून लढू’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरीतील रहिवासी व राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांची सोलापूर लोकसभा (अनुसूचित राखीव) मतदारसंघासाठी भाजपकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. त्या दृष्टीने सोलापुरात साबळे यांचा अधिकाधिक संपर्क कसा वाढेल, या दृष्टीने नियोजनबद्ध रीत्या आखणी करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने आदेश दिल्यास निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे साबळे यांनी म्हटले आहे.

लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापुरातून काँग्रेसचे उमेदवार होते. भाजपचे शरद बनसोडे यांनी त्यांचा पराभव केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून सोलापुरातील काही भाजप पदाधिकाऱ्यांनी साबळे यांना सोलापुरातून संधी देण्याची मागणी पुढे केली आहे. त्यापाठोपाठ, दोन महिन्यांपासून साबळे सोलापूरात सक्रिय झाले आहेत. येथील विविध कार्यक्रमांना त्यांची हजेरी दिसून येते. २६ जानेवारीला ते सोलापूर दौऱ्यावर होते. दलित चळवळीतील विविध कार्यकर्त्यांच्या ते गाठीभेटी घेत असून सोलापुरातील राजकीय प्रस्थ मानले जाणारे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याही ते संपर्कात आहेत. पंढरपूर व सोलापूर परिसरात साबळे यांचा पूर्वीपासून संबंध असल्याचे सांगत यापूर्वीच्या काही निवडणुकांमध्ये ते सक्रिय सहभागी झाल्याचे दाखले दिले जात आहेत. सोलापूर चाचपणीसंदर्भात, साबळे यांच्याकडे विचारणा केली असता, या माहितीस त्यांनी दुजोरा दिला. आपण लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली नाही. मात्र, भाजपकडून आदेश मिळाल्यास आपण सोलापूरच नव्हे तर कोणत्याही मतदारसंघातून लढण्यास तयार आहोत, असे त्यांनी सांगितले. तथापि, अधिक भाष्य करण्याचे टाळले.

कुठे संधी मिळणार?

अमर साबळे मूळचे बारामतीचे आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर  प्रतिष्ठेचा मुद्दा करत गोपीनाथ मुंडे यांनी साबळे यांना पिंपरीत उमेदवारी मिळवून दिली. मात्र, पक्षांतर्गत गटबाजीतून ते पराभूत झाले. पुढे, भाजप सत्तेत आल्यानंतर साबळे यांची राज्यसभेवर वर्णी लागली. पुन्हा राज्यसभा, लोकसभा की पिंपरी विधानसभा यापैकी साबळे यांना कुठे संधी मिळणार, अशी चर्चा सुरू असतानाच थेट सोलापुरासाठी त्यांच्या नावाची चाचपणी सुरू झाली आहे.

आपली वैयक्तिक महत्त्वाकांक्षा किंवा इच्छा नाही. मात्र, पक्षाने आदेश दिल्यास सोलापुरातूनच काय कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढण्याची आपली तयारी आहे.

-अमर साबळे, खासदार

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp test amar sable name for solapur parliamentary constituency