शहरातील वाहतूक समस्या हा प्राधान्याने हाती घेण्याचा विषय असल्याचे नवनिर्वाचित आमदारांनी मान्य केले आहे. पुण्याच्या विकासाला प्राधान्य देतानाच वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देत शहरासाठी आवश्यक असलेले ‘बजेट’ही आणू अशी ग्वाही आमदारांनी पुणेकरांना दिली आहे. मात्र, पुणेकरांच्या समस्यांची पूर्ती करण्यासाठी केंद्र आणि राज्याप्रमाणेच महापालिकेतही एक हाती सत्ता द्यावी, असे आवाहन करण्यासही आमदार विसरले नाहीत.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात राज्यमंत्री दिलीप कांबळे, माधुरी मिसाळ, विजय काळे, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर आणि जगदीश मुळीक हे शहरातील नवनिर्वाचित आमदार सहभागी झाले होते. पैशांअभावी, अधिकाऱ्यांच्या आस्थेअभावी आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे एकात्मिक वाहतूक योजना अमलात येऊ शकली नाही याकडे लक्ष वेधून माधुरी मिसाळ यांनी पुण्याच्या वाहतूक प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी प्राथमिक चर्चा झाली असल्याचे सांगितले. ‘मेट्रो’चा विषय केंद्र सरकारकडे प्रलंबित असल्याची चर्चा केली गेली खरी. पण, राज्यातील त्यावेळच्या सरकारने काही बाबींची पूर्तता केली नाही. त्यामुळे आता या संदर्भात आलेल्या हरकतींचा विचार करून पुन्हा नव्याने प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे.
‘मेट्रो’मध्ये केवळ दोनच मार्ग असल्याने ‘पीएमपी’ सक्षम करावीच लागेल, असे सांगून मेधा कुलकर्णी म्हणाल्या, पीएमपी सक्षम केली तर मोनोरेलची गरजच भासणार नाही. महापालिकेने सार्वजनिक वाहतूक सुधारणेला प्राधान्य देणारे वर्ष ठरविले पाहिजे. त्या वर्षीच्या अंदाजपत्रकात सर्वाधिक तरतूद ही वाहतुकीसाठी असेल. पुण्याच्या तुलनेत नागपूरची वाढ मर्यादित आहे. त्यामुळे तेथे दिलेला चार ‘एफएसआय’ पुण्यात लागू करता येणे शक्य होणार नाही.
वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी मेट्रो झाली पाहिजे याविषयी दुमत नाही. पण मेट्रो हाच एकमेव पर्याय आहे का याचा विचार झाला पाहिजे. पुढच्या ५० वर्षांचा विचार करून मेट्रोचा विचार करावा लागेल. सेनापती बापट रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी उड्डाण पूल आवश्यक आहे. विकासामध्ये नागरिकांची मते जाणून घेण्यात येणार असून पुणेकरांनी त्यांच्या कल्पना ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन विजय काळे यांनी केले. पाणीपुरवठा, आरोग्य या विषयांना प्राधान्य देणार असल्याचे सांगत काळे यांनी डेंग्यू वाढला असताना महापालिका स्वस्थ बसली आहे, यावर बोट ठेवले.
वाहतूक आणि कचरा या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे सांगून योगेश टिळेकर म्हणाले, आमच्यावर सातत्याने अन्याय होत असल्याची भावना आहे. त्यातूनच पूर्व भागासाठी स्वतंत्र महापालिका असावी, अशी मागणी होत आहे. समाविष्ट गावातील रस्ते ताब्यात घेऊन विकसित केले तर वाहतुकीचा प्रश्न सुटू शकेल. खराडी-शिवणे नदीपात्रातील रस्ता पूर्ण करण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगून जगदीश मुळीक यांनी पिण्याचे आणि वापरण्याचे पाणी वेगळे असे नियोजन केले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
 पुण्याला न्याय मिळेल
पुण्याने आठही उमेदवारांना विजयी करून भाजपवर विश्वास दाखविला असताना मंत्रिमंडळात एकच मंत्रिपद देऊन अन्याय केला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर विजय काळे यांनी मंत्रिमंडळात पुण्याला योग्य न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला. नव्या फलंदाजाला सलामीचा फलंदाज म्हणून पाठविल्यावर होते तशी माझी अवस्था झाली आहे. पण, व्यवस्थापक आणि कर्णधाराला विचारल्याशिवाय बोलणे योग्य होणार नाही. शहरातील कोण मंत्री होतो यापेक्षाही विकास होतो की नाही हे अधिक महत्त्वाचे आहे. विधिमंडळामध्ये आम्ही सत्ताधारी असलो तरी कामांची पूर्तता करून घेण्यासाठी प्रशासनाला धारेवर घरणारे विरोधकदेखील होऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा