पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन संपर्क करावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना करण्यात आले असून या आवाहनानुसार शहर भाजपतर्फे संपर्क अभियान सुरू केले जाणार आहे. ‘एक नोट कमल पर व्होट’ या अभियानाचा प्रारंभ शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) होईल.
पक्षाचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांनी गुरुवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन पक्षाचा प्रचार करावा आणि पक्षासाठी मतदानाचे व निधीचे आवाहन नागरिकांना करावे, अशा स्वरुपाचे हे अभियान असल्याचे शिरोळे म्हणाले. या अभियानात पुण्यातील तीन लाख घरांमध्ये पोहोचून नागरिकांशी संपर्क साधला जाईल. बूथ समितीच्या कार्यकर्त्यांमार्फत हा संपर्क साधला जाणार असल्याचेही ते म्हणाले.
शहरात या निमित्ताने संपर्क फेऱ्यांचे तसेच संपर्क यात्रांचेही आयोजन करण्यात येणार आहे. पहिली संपर्क यात्रा शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) सकाळी दहा वाजता नाना पेठेतील दर्शन हॉल येथून सुरू होईल. तसेच सायंकाळी सहा वाजता नळस्टॉप चौकापासून दुसरी यात्रा काढली जाणार आहे. आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, प्रा. मेधा कुलकर्णी, योगेश गोगावले, दिलीप कांबळे, अशोक येनपुरे, गणेश बीडकर आदींची या वेळी उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा