पिंपरी : शिवसेना-भाजप सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी रावण दहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी केल्याने मित्र पक्ष भाजपने हल्ला केला आहे. अकलेचे तारे तोडून असे विधान करणाऱ्या मिटकरी यांनी तत्काळ माफी मागावी किंवा श्रीलंकेत स्थायिक होऊन रावणाची पूजा करावी, असा सल्ला देत माफी न मागितल्यास त्यांच्या पुतळ्याचे महाराष्ट्रभर दहन करण्याचा इशारा भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी दिला आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी अकलेचे तारे तोडून रावण दहनावर बंदी आणावी असे विधान केले आहे. रामायनातील संपूर्ण वानर सेना ही मागासवर्गीय वंचित, सर्व समाजातील होती. याचा उत्तम उल्लेख श्रेष्ठ वाल्मिकी ऋषी यांनी केला असताना, या सर्व समाजाच्या यशाला काळीमा फासण्याचा प्रकार मिटकरी यांनी केला आहे. राज्यात रावण दहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याबाबत हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>पुणे : नवरात्रोत्सवातील कार्यक्रमात महिलेसह दोघांवर कोयत्याने वार, तीन तरुणांना अटक
वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणाला आव्हान देण्याचा प्रकार मिटकरी करत आहेत. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून सर्व जनतेच्या आणि खास करून वंचित ,मागासवर्गीय जनतेच्या भावना दुखावणारा आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. अशा प्रकारची मागणी त्यांनी पुन्हा केली तर संपूर्ण महाराष्ट्रभरात आंदोलन उभे करून ठिकठिकाणी त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात येईल असा इशारा गोरखे यांनी दिला आहे.