छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान राज्यातील जनता सहन करणार नाही. संभाजी महाराज धर्मवीरच होते आणि धर्मासाठी त्यांनी बलिदान केले. मात्र मतांसाठी अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करणारी राष्ट्रवादी काँग्रेस इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे संभाजी महाराजांविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अजित पवार यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.
हेही वाचा- भाषेसंदर्भात टिंगलटवाळी टाळा! ज्येष्ठ नेते शरद पवार यांची अपेक्षा
दरम्यान, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे नामोल्लेख असलेल्या स्टिकरचे वितरण या वेळी भाजपकडून करण्यात आले. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार यांनी केलेले वक्तव्य मागे घेतले पाहिजे आणि महाराष्ट्रातील शिव प्रेमी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे यावर भाजपा ठाम आहे, असे जगदीश मुळीक यांनी सांगितले.
दरम्यान, सर्वसामान्य जनतेच्या मनात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ज्या भावना आहेत आणि इतिहासामध्ये त्यांच्या जाज्वल्य धर्म प्रेमामुळे त्यांची जी प्रतिमा अधोरेखित झाली आहे त्याच प्रतिमेचा पुनरुच्चार करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” असे नामोल्लेख असलेल्या स्टिकरचे आज प्रकाशन करून वितरणास प्रारंभ झाला असून संपूर्ण शहरात त्याचे वितरण करण्यात येणार आहे, असे मुळीक यांनी स्पष्ट केले.