कामगारांची थकीत देणी देण्याकरिता आवश्यक निधी उभारण्यासाठी एचए कंपनीची जमीन विकण्याचा यापूर्वीच्या सरकारने घेतलेला निर्णय दुर्दैवी असून इंचभरही जमीन विकण्याची वेळ कंपनीवर येऊ नये, असे मत भाजपचे खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केले आहे. बिल्डरच्या घशात कंपनीची जमीन घालू देणार नाही, असेही ते म्हणाले.
एचए कंपनीच्या प्रवेशद्वासमोर कामगारांचे धरणे आंदोलन सुरू आहे, तेथे भेट दिल्यानंतर साबळे बोलत होते. खासदार झाल्यानंतर या विषयाशी संबंधित अनंतकुमार व हंसराज अहिर या केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. म्हाडाकडील थकीत रक्कम कंपनीला मिळण्याचा निर्णय आठवडय़ाभरात होईल. थकबाकीच्या कारणावरून कंपनीचा वीजपुरवठा खंडित होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. कंपनी पूर्वपदावर आली पाहिजे. मात्र, त्यासाठी कंपनीची इंचभरही जमीन विकण्याची वेळ येऊ नये. एचए कंपनी देशाची गरज आहे. देशाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी एचएतील उत्पादन कायम राहिले पाहिजे. हा प्रश्न सुटावा, यादृष्टीने भाजपचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आंदोलकांच्या भावना सरकापर्यंत पोहोचवू, असे ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजप शहराध्यक्षासमोरच ‘मोदी हाय-हाय’
आश्वासन देऊन त्याचा विसर पडण्याच्या राज्यकर्त्यांच्या प्रवृत्तीमुळे एचए कामगार संतापलेले आहेत. मोदी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या हंसराज अहिर यांनी एक महिन्यात प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यांचे आश्वासनही हवेतच विरले. त्यामुळे आघाडी सरकारविषयी जी भावना कामगारांमध्ये होती, तीच मोदी सरकारविषयी निर्माण झाली, त्याचा प्रत्यय शनिवारी दिसून आला. भाजप शहराध्यक्ष सदाशिव खाडे आंदोलनाच्या ठिकाणी येऊन स्थानापन्न झाले, तेव्हा ‘मोदी हाय-हाय’च्या घोषणा देण्यात आल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp will try hard for ha land