पुणे शहर आणि जिल्ह्य़ातून भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभेच्या आठ मतदारसंघांसाठी तब्बल ८४ जण इच्छुक असून पक्षाचे निरीक्षक पांडुरंग फुंडकर आणि हरिभाऊ बागडे यांनी या इच्छुकांच्या मंगळवारी मुलाखती घेतल्या. भाजपमध्ये एवढय़ा मोठय़ा संख्येने प्रथमच इच्छुकांनी तयारी सुरू केली असून मुलाखती सुरू असताना काँग्रेसचे आमदार निम्हण यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशा जोरदार घोषणा निरीक्षकांसमोर देण्यात आल्या.
युतीच्या जागा वाटपात भाजपच्या वाटय़ाला जे मतदारसंघ येतात, त्यातील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम पक्षाने सुरू केला आहे. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड मधील मिळून आठ मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती पक्षाचे निरीक्षक पांडुरंग फुंडकर आणि हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी घेतल्या. लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे महायुतीच्या आशा वाढल्या असून त्यामुळे इच्छुकांच्याही संख्येत चांगलीच वाढ झाल्याचे मुलाखतींच्या ठिकाणी पाहायला मिळाले. युतीच्या जागावाटपात जे मतदारसंघ भाजपकडे नाहीत, अशा मतदारसंघातील काही इच्छुकांनी देखील निरीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. युतीच्या जागावाटपात कॅन्टोन्मेंट मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. मात्र, त्यात भाजपची ताकद चांगली असल्यामुळे तो भाजपने घ्यावा, अशी मागणी या वेळी निरीक्षकांकडे करण्यात आली.
पक्षाने ठरवलेल्या कार्यक्रमानुसार इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. आमचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना दिला जाईल. पुढील निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे बागडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ज्या मुलाखती झाल्या, ते सर्व भाजपचेच कार्यकर्ते होते. अन्य पक्षातील कोणीही मुलाखत दिलेली नाही, असेही ते म्हणाले.
पुण्यात शिवाजीनगरमधून सर्वाधिक इच्छुक
कसबा मतदारसंघातून सहा, पर्वतीमधून पाच, शिवाजीनगरमधून पंधरा, खडकवासल्यातून चार, पिंपरी-चिंचवड मतदारसंघातून सहा, मावळमधून सोळा, शिरूरमधून अकरा आणि दौंडमधून चौदा जण इच्छुक असल्याचे या वेळी सांगण्यात आले. आमदार गिरीश बापट, गणेश बीडकर, हेमंत रासने, धीरज घाटे, मुक्ता टिळक, अशोक येनपुरे कसब्यातून, तर आमदार माधुरी मिसाळ, श्रीनाथ भिमाले, गोपाळ चिंतल, विनोद वस्ते हे पर्वतीमधून इच्छुक आहेत. शिवाजीनगरमधून प्रा. विकास मठकरी, मुरलीधर मोहोळ, प्रा. मेधा कुलकर्णी, दत्ता खाडे, रवी साळेगावकर, बाळासाहेब अमराळे आदी पंधरा जण इच्छुक आहेत, तर खडकवासला मतदारसंघातून आमदार भीमराव तापकीर, मनोहर बोधे, राजाभाऊ जोरी, संजय पोकळे इच्छुक आहेत.
निम्हण यांना प्रवेश नको; कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणा
शिवाजीनगर मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती सुरू असताना जोरदार घोषणा देण्यात आल्या. काँग्रेसचे आमदार विनायक निम्हण या मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुलाखती सुरू असताना निम्हण यांना पक्षात घेऊ नये, अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

Story img Loader