अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मंगळवारी दिलगीरी व्यक्त केल्यानंतर भाजपनेही आपली विरोधाची तलवार म्यान केली असून, येत्या शुक्रवारपासून पिंपरीमध्ये सुरू होत असलेले साहित्य संमेलन निर्विघ्न पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले. सबनीस यांनी माफी मागितल्यामुळे या वादावर आम्ही पडदा टाकला असल्याचे भाजपचे खासदार अमर साबळे यांनी बुधवारी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरीत उल्लेख करीत त्यांच्या पाकिस्तान दौऱ्यावर टीका केल्यामुळे भाजपने श्रीपाल सबनीस यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. साहित्य संमेलनस्थळी सबनीस यांना पाय ठेवू देणार नाही, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केले होते. राज्यात विविध ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सबनीस यांच्या विरोधात निदर्शने केली. स्थानिक खासदार अमर साबळे यांनीही या मुद्द्यावरून सबनीस यांचा विरोध करताना त्यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना संमेलनस्थळी येऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. या विषयावरून राजकीय वातावरण तापू लागल्यावर सबनीस यांनी मंगळवारी संध्याकाळी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली. आपण आपले शब्द मागे घेत आहोत आणि मोदी यांना पत्र लिहून ‘मन की बात’ त्यांच्यापर्यंत पाठवली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या पार्श्वभूमीवर भाजपनेही आपला विरोध म्यान केला आहे.
अमर साबळे म्हणाले, सबनीसांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे हा वाद आता संपुष्टात आला आहे. सबनीसांना आमचा विरोध मुद्द्यांवर होता. पण त्यांनी आपले शब्द मागे घेतल्यामुळे व्यापक हित पाहून आम्ही आता वाद वाढविणार नाही. पिंपरी-चिंचवडमधील संमेलन सुरळीत पार पडेल. आम्ही साहित्य सेवकाचे वारकरी म्हणून संमेलनाला हजेरी लावणार आहोत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांच्याकडे आम्ही आमच्या भावना पोहोचविल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सबनीसांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पुन्हा वादग्रस्त वक्तव्ये करू नयेत, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader