उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळेगाव येथील नगर परिषदेच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं. यावरून आता राजकारण रंगलं आहे. भाजपाने जिथं अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं तिथं गोमूत्र आणि पंचामृत शिंपडून ती जागा पवित्र केली आहे. मावळमधील बंद जल वाहिनीबाबत आंदोलन करणाऱ्यांवर बेछूट गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले हे सगळ्यांना माहिती आहे, असं म्हणत भाजपाने अजित पवारांवर गंभीर आरोप केला. तसेच अशा व्यक्तीच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आल्याने गोमूत्र आणि पंचामृत शिंपडून ती जागा पवित्र केल्याचं भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सांगितलं.
गणेश भेगडे म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे येथील नगर परिषदेच्या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं. ९ ऑगस्ट २०११ ला मावळमधील नागरिकांनी पवना बंद जल वाहिनीचे आंदोलन केले होते. ते संपूर्ण मावळ तालुका, तळेगावात झाले होते. या आंदोलनामध्ये पोलिसांना बेछूट गोळीबाराचे आदेश कोणी दिले हे सगळ्यांना ठाऊक आहे.”
हेही वाचा : “खोटं सांगत नाही, कधी कधी अती व्यायाम वर घेऊन जातो, त्यामुळे…”; अजित पवारांचा तरुणांना सल्ला
“म्हणून बेछूट गोळीबाराचे आदेश देणाऱ्या माणसाच्या हस्ते नगरपरिषदेच्या इमारतीचे भूमिपूजन करणार असाल, शासकीय कार्यक्रमाचा राजकीय कार्यक्रम करणार असाल तर याचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध करतो. ज्या अपवित्र हातांनी भूमिपूजन झालं आहे, भूमी अपवित्र झाली ती जागा पवित्र करण्यासाठी गोमूत्र आणि पंचामृत शिपडण्यात आलं,” असं गणेश भेगडे यांनी सांगितलं.