कसबा विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अजित पवारांच्या भाषणावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे.
आमदार चेतन तुपे,आमदार संग्राम थोपटे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक सभेला उपस्थित होते.
या सभेवेळी अजित पवार यांचे भाषण सुरू असताना सभेच्या बाहेरील बाजूस असलेल्या रस्त्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले.
त्या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, निवडणुक आयोगाच्या नियमानुसार एकमेकांच्या प्रचारासाठी वेगवेगळे विभाग दिले जातात. मात्र आमची नातू बाग येथील सभेच्या ठिकाणी भाजपा उमेदवाराची रॅली काढण्यात आली. याबाबत आम्ही पोलिसांकडे नाराजी व्यक्त केली असून पोलीस भाजपाच्या दबावाखाली काम करीत आहे. हा रडीचा डाव असल्याची टीकाही जगताप यांनी केली.