वाहनांच्या टपावर, जेसीबीवर बसून भंडाऱ्याची उधळण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव यांची निवड झाली, त्याचा आनंद साजरा करताना जाधव समर्थक तसेच भाजप कार्यकर्त्यांनी अक्षरश: उन्माद केल्याचे दिसून आले. ढोल ताशांच्या दणदणाटात सुमारे १०० पोती भंडारा उधळून त्यांनी पालिका मुख्यालयाचा रंग पालटून टाकला आणि त्यातच पाऊस पडल्याने सर्वत्र पिवळा चिखल तयार झाला, त्याचा नागरिकांना त्रास झालाच, वाहने अडकून पडली, काही दुचाकीस्वार घसरून पडण्याचेही प्रकार घडले.

शनिवारी पालिका मुख्यालयात महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक होती. समाविष्ट गावातील चिखली-जाधववाडीचे प्रतिनिधीत्व करणारे, आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक राहुल जाधव यांना भाजपची उमेदवारी होती. निर्विवाद बहुमत असल्याने जाधव यांचा विजय निश्चित होता. त्यामुळे समर्थकांनी जल्लोषाची जोरदार तयारी केली होती. सकाळपासूनच तसा रागरंग दिसून येत होता. दुपारी दीडच्या सुमारास जाधव यांच्या निवडीवर सभागृहात शिक्कामोर्तब झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला. सुरुवातीला ढोल ताशांचा दणदणाट सुरू होता. त्यानंतर, भंडारा उधळण्यास सुरुवात झाली. प्रारंभी ५० पोती आणण्यात आली व ती कमी पडल्याचे सांगत आणखी पोती मागवण्यात आली. भंडारा उधळण्यासाठी कार्यकर्ते गाडय़ांच्या टपावर उभे राहिले होते. काही वेळानंतर जेसीबी आणण्यात आला होता. त्यावर बसून कार्यकर्ते भंडाऱ्याची उधळण करत होते. पालिकेत येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर भंडारा टाकण्यात आला. मुख्यालयात लावलेल्या चारचाकी व दुचाकी गाडय़ा पिवळ्या रंगाने न्हाऊन निघाल्या. थोडय़ा वेळात पाऊस आला. त्यानंतर, सर्वत्र पिवळा चिखल तयार झाल्याचे दिसून आले. त्यावरून जाणारी दुचाकी वाहने घसरू लागली. काहींना इजाही झाली. पाण्याचे फवारे मारून रस्ते स्वच्छ करावे लागले. भोसरी पट्टय़ातील कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उन्मादाचे वळण लागल्याने त्यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली आहे. मात्र, महापौर जाधव तसेच आमदार लांडगे यांनी या संदर्भात अद्याप कोणतेही भाष्य केले नाही.

प्रतिनिधी, पिंपरी