पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौरपदी भाजपाच्या नगरसेविका सरस्वती शेंडगे यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत मनसेच्या दोन्ही नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली तर एमआयएमच्या नगरसेविका मतदानावेळी अनुपस्थित राहिल्या.
मागील पंधरा दिवसांपूर्वी राज्यातील सर्व महापालिकेच्या महापौरपदाची सोडत काढण्यात आली. त्यावेळी पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी खुल्या सर्वसाधारण गटासाठी सोडत निघाली. खुल्या वर्गासाठी भाजपाकडून अनेक नगरसेवकांची नावे चर्चेत होती. मात्र, त्यासर्वांवर बाजी मारत महापौरपदासाठी भाजपाकडून मुरलीधर मोहोळ यांना तर उपमहापौरपदासाठी सरस्वती शेंडगे यांनी अर्ज दाखल केला होता. आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश कदम आणि काँग्रेसच्या चांदबी नदाफ यांनी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, आज महापालिकेच्या मुख्य सभागृहात निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आघाडीच्या बाजूने मतदान केले. तर, मनसेच्या दोन्ही नगरसेवकांनी तटस्थ भूमिका मांडली. एमआयएमच्या नगरसेविका यांच्यासह ५ नगरसेवक मतदानावेळी अनुपस्थित राहिले. यानंतर महापौरपदासाठी मुरलीधर मोहोळ ९७, महाविकास आघाडीच्या महापौरपदाचे उमेदवार प्रकाश कदम यांना ५९ तर उपमहापौरपदाच्या भाजपाच्या उमेदवार सरस्वती शेंडगे यांना ९७ आणि आघाडीच्या उपमहापौरपदाच्या चांदबी नदाफ ५९ एवढी मतं पडली. या मतांच्या आकडेवारीवरून महापौरपदी भाजपाचे मुरलीधर मोहोळ तर उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची निवड झाली.
यावेळी मावळत्या महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचा विशेष सत्कार केला.
पुणे महापालिकेतील एकूण नगरसेवक
- भाजप – ९९
- राष्ट्रवादी – ४२
- काँग्रेस – ९+१= १०
- शिवसेना – १०
- मनसे – २
- एमआयएम – १