राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळं अवघ्या राज्यात विरोधक आक्रमक झाले होते. आज सकाळीच पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध पक्षांनी आंदोलन करून पाटील यांचा निषेध केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येच त्यांच्यावर शाईफेकीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवर भाजपाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपा नेते आणि राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की, “मला वाटतं ही राजकीय दुर्दैवी घटना आहे. चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात दिलगिरी व्यक्त करताना, त्यांचा आशय काय होता, ही स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर मुद्दाम असा प्रकार करणं हे भविष्यात राजकारणात असे प्रकार मग वाढण्याची शक्यता आहे.” टीव्ही 9 शी मुनगंटीवार बोलत होते.

हेही वाचा – ‘फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली’ या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

याशिवाय, “आज एका पक्षाने करायचं उद्या दुसरा पक्षही करेल. म्हणून मला असं वाटतं की याची सरकारने योग्य चौकशी केली पाहिजे. एखादा माथेफिरू वेडा माणूस असं करत असेल, तर निश्चितपणे संघटनेला नाहक दोष येतो. समता परिषद असेल तर समता परिषदेचे कोणतेही कार्यकर्ते अशापद्धतीने कधीही वागणार नाही. हा एखाद्या व्यक्तीचा माथेफिरूपणा असू शकतो. त्या दृष्टीने सरकारने योग्य कारवाई करत, चौकशी करावी. यामागे कोणाचा मेंदू आहे का? एवढं तपासलं पाहिजे. कारण, चंद्रकांत पाटील यांनी अतिशय स्पष्टपणे दिलगिरी व्यक्त केली की माझा भाव तो नव्हता.” असंही यावेळी मुनगंटीवार म्हणाले.

शाईफेक करणाऱ्या व्यक्तील आणि त्याच्यासोबत घोषणाबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी घटनास्थळावरून तत्काळ ताब्यात घेतलं. यानंतर उपस्थित भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांकडून सुरक्षा व्यवस्थेबाबत पोलिसांना संतप्त सवाल करण्यात आला.

दरम्यान आज चंद्रकांत पाटील हे पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर असताना पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेस NSUI च्या वतीने त्यांना चिंचवड येथे काळे झेंडे दाखवण्यात आले. तसेच, ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या कार्यकर्त्यांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps first reaction on the incident of throwing ink on chandrakant patal msr