भारतीय जनता पक्षातील मुंडे-तावडे असे दोन गट व्यापक बैठकीच्या निमित्ताने बुधवारी एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच अचानक स्थानिक तिसऱ्या गटाच्या वजनदार नेत्याने जोरदार राजकीय खेळी करत ही बैठकच आयोजकांना रद्द करायला लावली. त्यामुळे पक्षातील नवी समीकरणे आणि गटबाजी पुन्हा एकदा उघड स्वरूपात समोर आली आहे.
शहर भाजपची बैठक दर सोमवारी सायंकाळी पक्षाच्या कार्यालयात होते. ती या आठवडय़ात सोमवारऐवजी बुधवारी सकाळी बोलावण्यात आली होती. ही बैठक मनोरमा मंगल कार्यालयात व्यापक स्वरूपात व जास्त वेळासाठी होणार होती. बैठकीच्या आयोजनात पक्षातील विनोद तावडे गटाचे समर्थक आघाडीवर होते. तसेच बैठकीचे निमंत्रण देणारे छोटे पत्रकही तयार करण्यात आले होते. विशेष म्हणजे पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुण्यातील खंदे समर्थक अनिल शिरोळे यांना या बैठकीत आमंत्रित करण्यात आले होते. पक्षाचा पुढील महिन्यात येत असलेला वर्धापनदिन तसेच संघटनात्मक बांधणी वगैरे विषयांवर बैठकीत चर्चा-विचार विनिमय होणार होता. शिरोळे यांनी या बैठकीचा समारोप करावा अशीही योजना होती व तसे पत्रिकेत नमूद करण्यात आले होते. गेली दोन-तीन वर्षे सातत्याने आमने-सामने येत असलेले हे दोन गट बैठकीच्या निमित्ताने एकत्र येणार असल्यामुळे बैठकीबाबत पक्षात उत्सुकता होती. तसेच गडगरी-तावडे आणि मुंडे गट जवळ येत असल्याचेही चिन्ह दिसत होते. त्यातून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी या गटांमध्ये काही नवी समीकरणे पुण्यात जुळणार का आणि जुळल्यास ती कशी असतील, याबाबतही चर्चा सुरू होती.
प्रत्यक्षात शहरातील एका वजनदार आमदाराने या बैठकीलाच थेट आक्षेप घेत प्रदेशाध्यक्षांकडे हा विषय नेला आणि बैठकीला विरोध केला. तसेच अन्यही काही कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी बैठकीसंबंधी तक्रार केली. त्यामुळे ही बैठक रद्द करावी, असा निरोप प्रदेशाकडून आयोजकांना आला आणि बुधवारी सकाळी सर्वाना बैठक रद्द झाल्याचे कळवण्यात आले. त्यामुळे पक्षातील नवी समीकरणे व नवे गट यांचा विषय अधिक तीव्रतेने चर्चेत आला असून शह-काटशहाचेही राजकारण होत असल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps meeting in pune cancelled at last moment due to political development
Show comments