पुणे : मूलबाळ होत नसल्याने आणि आर्थिक सुबत्ता येण्यासाठी संगणक अभियंता असलेल्या पत्नीला स्मशानातील राख पाण्यातून पिण्यासाठी देण्याबरोबरच, पिस्तुलाच्या धाकाने मृतांच्या हाडांची भुक्टी खाण्यास भाग पाडून अघोरी पूजा करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील धायरी भागात उघडकीस आला आहे.
या प्रकरणी २८ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पतीसह त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात पती जयेश कृष्णा पोकळे, तसेच श्रेयश कृष्णा पोकळे, ईशा श्रेयश पोकळे, प्रभावती कृष्णा पोकळे, कृष्णा विष्णू पोकळे (रा. राधाकृष्ण व्हीला, पोकळे पॅराडाईज, धायरी) दीपक जाधव आणि बबीता उर्फ स्नेहा जाधव (रा. निगडी प्राधिकरण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – राष्ट्रवादीचे बहुमत तरीही अडचणीतील ‘महानंद’ची सूत्रे विखेंच्या हाती
विवाहितेचा छळ
एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि जयेशचा विवाह ठरल्यानंतर साखरपुडा पंचतारांकित हॉटेलात ठेवणे, ८० तोळे सोने द्यावे, साखरपुड्याला येणाऱ्या प्रत्येक महिलेला जोडवे द्यावेत आदी मागण्या पोकळे कुटुंबीयांनी केल्या होत्या. मागणीला होकार दिल्याने साखरपुडा झाला. त्यानंतर मोटारीची मागणी झाली. त्यानुसार पाच लाखांची गाडीही देण्यात आली. विवाह थाटामाटात झाला, मात्र त्यानंतर विवाहितेचा छळ सुरू झाला.
अमावस्येला घरातील मंडळी एकत्र येऊन आणि काळे वस्त्र घालून तळघरात रहस्यमय खोलीत काहीतरी करीत असल्याचे तिला एकदा दिसले. मोबाइलवर एक महिला सांगेल त्याप्रमाणे घरातील व्यक्ती पूजा करीत होत्या. व्यावसायात भरभराट व्हावी आणि मूल होण्यासाठी प्रत्येक अमावस्येला अशीच पूजा होऊ लागली. त्यात विवाहितेलाही सहभागी करून घेतले जात होते.
एका अमावस्येला पतीसह सर्व मंडळींनी तिला घराजवळील स्मशानभूमीत नेले. जळालेल्या प्रेताची हाडे त्यांनी जमा केली. राखही बरोबर घेतली. या वस्तू घरी आणून त्यांनी पूजा केली आणि ती राख पाण्यात टाकून बळजबरीने तिला पिण्यासाठी दिली. विवाहितेच्या जावेच्या आई-वडिलांकडे निगडी येथे अशीच पूजा असल्याचे सांगून तिला एकदा तेथे नेण्यात आले. त्या घरीही अघोरी पूजा मांडण्यात आली होती. तेथे मांत्रिक महिलेने तिला पूजेला बसविले. मृताची हाडे, केस, घुबडाचे पाय, कोंबड्याचे मुंडके, असे सर्व त्या ठिकाणी होते. तेथे हाडांची पावडर करून तिला खाण्यासाठी दिली. तिने नकार दिला असता पिस्तुलाचा धाक दाखविण्यात आला. या सर्व प्रकारांना कंटाळूवन तिने अखेर याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला.