दहशतवादाची रसद तोडणे, काळा पैसा बाहेर काढणे आणि भ्रष्टाचार रोखणे यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा सपशेल अपयशी ठरला असून उलट नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा अनायासे पांढरा झाला, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केले. नोटाबंदी ही मोदीनिर्मित आपत्ती असून आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांनी देशाची माफी मागितली होती. त्याचे अनुकरण करीत आता मोदी यांनी देशवासीयांची माफी मागावी. अन्यथा जनता मोदींना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असेही चव्हाण म्हणाले.
लोकमान्य टिळक प्रतिष्ठानतर्फे ‘नोटाबंदी आणि त्याचे परिणाम’ या विषयावर चव्हाण यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. एच. एम. देसरडा, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, संयोजक अभय छाजेड, रोहित टिळक आणि नगरसेवक संजय बालगुडे या वेळी उपस्थित होते.
नोटाबंदीचा निर्णय घेताना देश पंतप्रधानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. काँग्रेसनेही पाठिंबा देताना काळा पैसा बाहेर काढण्यात पंतप्रधानांना यश लाभो, या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, दहशतवाद थांबला नाही. भ्रष्टाचारामध्ये भाजप नेत्यांचेच पैसे सापडल्याची उदाहरणे देशाने पाहिली. नोटाबंदीच्या निर्णयाने काळा पैसा अनायासे पांढरा झाला. त्यामुळे नोटाबंदी हे ब्रह्मास्त्र आता मोदी यांच्यावरच उलटले आहे, असे सांगून चव्हाण म्हणाले, काळी संपत्ती ही प्रामुख्याने परदेशी बँका, सोने-चांदी, हिरे-जवाहिरे, जमीनजुमला, परकीय चलनामध्ये आणि बेनामी कंपन्यांमधील भागभांडवल यामध्ये गुंतविली जाते. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ सहा टक्के संपत्ती नोटांच्या माध्यमातून तरलता म्हणून ठेवली जाते. नोटाबंदीनंतर यापैकी बहुतांश नोटा बँकेमध्ये जमा झाल्याने काळा पैसा पांढरा झाला आहे. काळा पैसा जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या नावावर प्रत्येकी अडीच लाख रुपयांप्रमाणे जमा झाला असे सरकारचे म्हणणे आहे. ते कदाचित खरेही असेल.
भाजप अध्यक्ष अमित शहा हे अहमदाबाद बँकेचे संचालक आहेत. त्यामुळे तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण काढून घेण्यात आले. दोषी संचालकांवर कारवाई करण्यापेक्षा जिल्हा बँका गोठवून शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे नुकसान केले गेले.
चव्हाण म्हणाले, उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच नोटाबंदीचा निर्णय घेतला गेला. मोठय़ा चलनी नोटा नकोत तर मग दोन हजाराची नोट का काढली याचे समाधानकारक उत्तर सरकार देत नाही. पाचशे रुपयांच्या नोटेला हात लावू नका, असे सांगणाऱ्या रघुराम राजन यांना रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरपदावरून हटवून ऊर्जित पटेल यांची नियुक्ती केली गेली. नोटांचा आकार बदलून पाचशे रुपयांच्या नोटांची टंचाई मुद्दाम का निर्माण केली गेली.
कॅशलेसचा अट्टाहास कशासाठी?
देशातील ग्रामीण भागात मोबाइल, एटीएम अशा पायाभूत सुविधा नसताना कॅशलेस अर्थव्यवस्थेचा अट्टाहास हा बहुराष्ट्रीय खासगी उद्योगपतींच्या हितासाठी असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. रुपे कार्डचा प्रचार करण्याचे सोडून मुठभर लोकांच्या फायद्यासाठी कॅशलेसचा आग्रह धरला जात आहे. अनेकांना धनादेश लिहिता येत नाहीत की डेबिट कार्डचा वापर करता येत नाही. ‘पेटीएम’मध्ये ४० टक्के भांडवल चिनी कंपनीचे आहे. त्यामुळे ‘जनाची ना मनाची लाज’ ठेवून पंतप्रधानांनी चूक मान्य करावी. देशाला सावरण्यासाठी काँग्रेस मोदी यांना साथ देईल, असेही चव्हाण म्हणाले.