पुढील शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळातर्फे (बालभारती) तयार केल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने जोडली जाणार आहेत. पथदर्शी पद्धतीने स्वरुपात राबवल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत प्रत्येक घटक, पाठ, कविता यांच्या शेवटी कोरे पान जोडले जाणार असून, पुस्तकांची चार भागांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : फुकट्या प्रवाशांकडून २२ कोटींची वसुली

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने समाविष्ट करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यानंतर आता पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी प्रसिद्ध केला. पाठ्यपुस्तकांमध्ये जोडलेल्या कोऱ्या पानावर विद्यार्थ्यांनी वर्गात अध्यापन सुरू असताना शब्दार्थ, महत्त्वाचे सूत्र, टिपण काढणे अपेक्षित आहे. पाठ्यपुस्तकातील ही कोरी पाने माझी नोंद या सदराखाली वापरणे आवश्यक आहे. शाळेत शिक्षक काय शिकवतात, वर्ग कार्याचा स्तर कसा आहे हे या नोंदीवरून समजू शकते. तसेच त्यात आवश्यकतेनुसार सुधारणा करता येऊ शकते. पाठ्यपुस्तकातील प्रश्नांव्यतिरिक्त सराव, वर्गकार्य, गृहपाठ यासाठी विद्यार्थ्यांना वेगळ्या वह्या वापरण्याची मुभा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> “…तर माझा धंगेकरांसारखा विजय झाला असता”, पराभवानंतर बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचं विधान

राज्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या तिसरी ते आठवी या इयत्तांसाठीची पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरुपात चार भागांमध्ये विभागून तयार करावीत. पहिली आणि दुसरीची पाठ्यपुस्तकेही चार भागांमध्ये तयार करून त्यात आवश्यकतेनुसार सरावासाठीची पाने समाविष्ट करावीत.   नववी आणि दहावीच्या पाठ्यपुस्तकांच्या अनिवार्य विषयांची चार भागांमध्ये विभागणी करावी. श्रेणी, वैकल्पिक विषयांची पुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करून द्यावीत. श्रेणी आणि वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये समाविष्ट न करता विद्यार्थी, पालक, विक्रेते आणि शासकीय योजनेत होणाऱ्या मागणीनुसार स्वतंत्र पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावीत, असे नमूद करण्यात आले आहे. 

खासगी शाळांमध्ये नियमित पाठ्यपुस्तके

खासगी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावीत. पाठ्यपुस्तक मंडळाकडे नियमित पाठ्यपुस्तकांचा शिल्लक असलेला साठा, पाठ्यपुस्तक विक्रेत्यांकडे शिल्लक साठा संपुष्टात आल्यानंतर चार भागात उपलब्ध करून द्यावीत. या पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने समाविष्ट करू नयेत. शासकीय शाळांमध्ये या योजनेचा फायदा झाल्यास आणि  नियमित पाठ्यपुस्तकांमध्येही वह्यांची पाने समाविष्ट करण्याची मागणी झाल्यास पुढील शैक्षणिक वर्षापासून कोरी पाने पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

वाढीव किमतीची प्रतिपूर्ती कागदाच्या किमतीत झालेल्या दरवाढीमुळे पाठ्यपुस्तकाच्या किमतीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे समग्र शिक्षा योजनेअंतर्गत आणि खुल्या बाजारात पुरवठा होणाऱ्या सर्व पाठ्यपुस्तकांचे पाठ्यपुस्तक मंडळाच्या मूल्यांकन सूत्रानुसार नव्याने मूल्यांकन करून किंमत निश्चित कराव्यात आणि ही पाठ्यपुस्तके चार भागांत उपलब्ध करून द्यावीत. पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने जोडल्यामुळे पाठ्यपुस्तकांच्या सध्याच्या किमतीत वाढ होणार आहे. या वाढीव किमतीचा बोजा पाठ्यपुस्तक मंडळावर पडू नये म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे वाढीव किमतीची परिपूर्ती करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blank pages in textbooks from class 3rd to 10th in the next academic year pune print news ccp 14 zws