अंध विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी आता लेखनिकाबरोबरच ‘जॉ’, ‘लेखा’ यांसारख्या संगणक प्रणालीही उपलब्ध करून देण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाने महाविद्यालयांना दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर विभागाने या सूचना दिल्या आहेत.
राज्यातील अंध विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कालावधीत लेखनिक उपलब्ध करून देण्याचा नियम यापूर्वीच आहे. मात्र लेखनिक मिळण्यास अडचणी येतात. त्याचप्रमाणे लेखनिकाला विषयाची माहिती नसते त्यामुळे काही वेळा प्रश्न चुकीचा वाचून दाखवला जातो. या महाविद्यालये किंवा विद्यापीठाच्या परीक्षांबरोबरच विविध प्राधिकरणाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा देतानाही विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते. पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अंध विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या विविध मोफत संगणक प्रणाली उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. याबाबत एका तरुणाने न्यायालयांत रिट याचिका दाखल केली होती.
न्यायालयाच्या निर्णयानुसार आता अंध किंवा अधुदृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान विविध संगणक प्रणालीही उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. ‘जॉ’, ‘लेखा’ यांसारख्या मजकूर वाचून दाखवणाऱ्या आणि बोललेल्या मजकुराचे लिखित स्वरूपात रूपांतर करणाऱ्या प्रणाली उपलब्ध करून देण्याच्या सूचना उच्चशिक्षण विभागाने माहविद्यालयांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे महाविद्यालयात कोणती प्रणाली उपलब्ध करून देण्यात यावी, याची विद्यार्थ्यांला पूर्वकल्पना देण्यात यावी असेही विभागाने त्यांच्या परिपत्रकांत नमूद केले आहे. मात्र मुळातच अपंग विद्यार्थ्यांबाबत असलेल्या नियमांकडेही दुर्लक्ष करणारी महाविद्यालये या नव्या सूचनांकडे गांभीर्याने पाहणार का, याबाबत प्रश्नच आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blind students test computer system help