नियतीने जन्मापासून दृष्टी काढून घेत केलेल्या क्रूर थट्टेवर मात करीत आपल्यासारख्या अनेकांच्या जीवनात आनंद फुलविणाऱ्या बहिणीच्या विवाहासाठी कार्यकर्ते करवले झाले होते. आपल्या या भगिनीच्या जीवनामध्ये सौख्याचे क्षण येत असताना भावांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळले.
बारामती येथील नूतन होळकर आणि लातूर येथील अर्जुन केंद्रे या दृष्टिहीन युवक-युवतीचा शुभ विवाह रविवारी मोठय़ा थाटात झाला. यंदा सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या सेवा मित्र मंडळाने या दांपत्याचे पालकत्व स्वीकारले आणि लुई ब्रेल अंध-अपंग कल्याणकारी संस्थेच्या सहकार्याने हे लग्न झाले. एकमेकांची साथ निभावण्याचा निर्धार करीत नूतन आणि अर्जुन हे जीवनाचे जोडीदार झाले. उद्योजक राजूशेठ सांकला यांनी कन्यादान केले. दृष्टिहीन, अपंग मुलांसह सामाजिक कार्यकर्ते या विवाह सोहळ्यास उपस्थित होते. शाहीर हेमंत मावळे यांनी मंगलाष्टके म्हटली.
साखरपुडा आणि हळद समारंभ झाल्यावर दुपारनंतर विवाहाची तयारी सुरू झाली. मंडपामध्ये मंगल सुरांनी वाजंत्री वाजू लागली. वधू-वराला बसण्यासाठीच्या विशेष खुच्र्यासह पाहुण्यांसाठीच्या खुच्र्याची मांडणी करण्यामध्ये कार्यकर्ते गुंतले होते. अक्षतांचे वाटप, फटाके उडविणे यांसह पारंपरिक वाद्यमेळ आणि आधुनिक डीजेच्या तालावर नाचण्याचा आनंदही त्यांनी लुटला. मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते यांनी कुटुंबप्रमुख म्हणून या सोहळ्याची जबाबदारी पार पाडली. बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, लिज्जत पापड उद्योगाचे सुरेश कोते, अॅड. प्रताप परदेशी यांनी नवदांपत्यास आशीर्वाद दिले. उदय जगताप, प्रशांत जाधव, पीयूष शहा, पराग ठाकूर, आनंद सराफ, विनायक घाटे, कुमार रेणुसे, वैभव वाघ हे कार्यकर्ते करवले झाले होते. बहिणीच्या रेशीमगाठी जुळल्याच्या आनंदाने आणि भगिनी सासरी जाणार, अशा दुहेरी भावनेतून कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले.

Story img Loader