दृष्टिहीन विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी ‘रायटर’ मिळणे मोठे जिकिरीचे. अनेकदा रायटर म्हणून काम करायला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यासाठी नेमके कोणाला भेटायचे हे माहिती नसते. पुण्यात मात्र हा प्रश्न तरुण कार्यकर्त्यांनी उभारलेल्या ‘रोशनी’ या नावीन्यपूर्ण प्रकल्पामुळे सुटू लागला आहे.
रोशनी प्रकल्प दृष्टिहीन विद्यार्थ्यांची ‘रायटर’शी भेट घालून देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. ‘परित्राणाय’ या सामाजिक संस्थेचे ५० विद्यार्थी कार्यकर्ते या प्रकल्पासाठी काम करतात. यात दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी ८१४९१४२१९३ हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून त्यांनी या हेल्पलाइनवर दूरध्वनी करून केवळ आपल्या परीक्षेचे नाव, स्थळ, दिवस, वेळ अशी माहिती देणे अपेक्षित आहे. ही माहिती घेतल्यानंतर त्या वेळी ज्या विद्यार्थ्यांस रायटर म्हणून काम करणे जमू शकेल त्याची दृष्टिहीन विद्यार्थ्यांशी गाठ घालून दिली जाते. ‘परित्राणाय’चे प्रवीण निकम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
निकम म्हणाले, ‘‘अभ्यासाची पुस्तके कशी वाचावीत हा प्रश्नही दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या पुढे आहे. यावर उपाय म्हणून संस्थेतर्फे त्यांना ऑडिओ पुस्तके बनवून देण्याचा आमचा विचार आहे. दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी त्यांना आवश्यक असणाऱ्या पुस्तकाचे नाव सांगितल्यास कार्यकर्ते ते पुस्तक आपल्या आवाजात विनामूल्य रेकॉर्ड करून देऊ शकतील. पुस्तकांचे ध्वनिमुद्रण करण्यासाठी ‘द पूना ब्लाइंड मेन असोसिएशन’चे निरंजन पंडय़ा यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी स्टुडिओ उपलब्ध करून देण्यास अनुकूलता दर्शवली आहे.’’
निकम यांची नुकतीच संयुक्त राष्ट्रांच्या ‘ए वर्ल्ड अॅट स्कूल’ या उपक्रमासाठी ‘ग्लोबल यूथ अँबॅसेडर’ म्हणून निवड झाली आहे. अधिक माहितीसाठी त्यांचा संपर्क क्रमांक- ९६६५२७७०६४
शिक्षणाच्या हक्कासाठी सोमवारी मोहीम
१६ जून (सोमवार) हा दिवस जागतिक पातळीवर ‘डे ऑफ द आफ्रिकन चाइल्ड’ म्हणून पाळला जातो. १६ जून १९७६ ला दक्षिण आफ्रिकेतील सोव्हेटो शहरात समान शिक्षणाच्या मागणीसाठी निदर्शने करणारे विद्यार्थी मारले गेले होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रत्येक बालकाला सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षणाचा हक्क मिळावा असा हा दिवस पाळण्याचा उद्देश आहे. या निमित्ताने संस्थेतर्फे डेक्कनवरील गुडलक चौकात दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळात शिक्षणाच्या हक्काबद्दल जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. या वेळी नागरिकांच्या सह्य़ाही घेण्यात येणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा