नैराश्य, आर्थिक चणचण व अपयशातून खचल्याने आत्महत्येचा विचार केला. मात्र, अपयशातून पुन्हा भरारी घेणाऱ्या सचिन तेंडुलकरची प्रेरणा घेतली आणि आत्महत्येचा विचार सोडून दिला, असे सांगत अंधांसाठी काम करणाऱ्या व स्वत: अंध असलेल्या सतीश नवले यांनी प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करण्याचे आवाहन केले आणि उपस्थितांना जणू जगण्याची दृष्टीच दिली.
नेत्रदानासाठी काम करणाऱ्या भोसरीतील जागृती फौंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त जागृती पुरस्कारांचे वितरण छत्रपती संभाजीमहाराजांच्या हस्ते करण्यात आले. महापौर मोहिनी लांडे, आमदार विलास लांडे, पुण्याचे उपमहापौर दीपक मानकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले, माजी महापौर संजोग वाघेरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश चांदगुडे, संस्थेचे अध्यक्ष राम फुगे, नगरसेवक अजित गव्हाणे, महेश लांडगे, नितीन लांडगे आदी उपस्थित होते.
यावेळी नवले म्हणाले, अंध म्हणून जगणे खूप अवघड आहे. आयुष्यात आर्थिक अडचणींमुळे अनेकदा नैराश्य आले, अपयश पदरी पडले. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन जीवन संपवण्याचा विचार केला. जेव्हा आत्महत्या करणार होतो. तेव्हा सचिन डोळ्यासमोर उभा राहिला. तोही अपयशी ठरत होता. मात्र प्रयत्न करून पुन्हा उभारी घेत होता. सचिनची प्रेरणा घेतली आणि आत्महत्येचा विचार सोडून दिला. छत्रपती संभाजीमहाराज म्हणाले, नेत्रदानाविषयी समाजात आजही जागृती नाही. त्यामुळेच या अवघड विषयात ‘जागृती’सारख्या संस्थेचे काम महत्त्वाचे ठरते. यावेळी दीपक मानकर, विलास लांडे, सुनंदनन लेले यांची भाषणे झाली. शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांच्या सीडीचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक राम फुगे यांनी, सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी, आभारप्रदर्शन विश्वास काशीद यांनी केले.
…एक क्षण अनुभवताना!
एखादा क्षण काही दिसत नसल्यास आपली काय अवस्था होते, ज्यांचे आयुष्यच अंधारात आहे, त्यांचे जीवन कसे असेल, असा प्रश्न विचारत ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी डोळ्यावर काळी पट्टी बांधून काही क्षण अनुभवण्याची विनंती पाहुण्यांना केली. त्यानुसार, व्यासपीठावरील सर्वानी काही वेळासाठी डोळ्यावर पट्टी बांधली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा