वार्ताहर, लोकसत्ता
इंदापूर : शासनाने दुधासाठी निश्चित केलेला हमी दर न देणाऱ्या सरकारी व खाजगी दूध प्रकल्पांवर कारवाई करावी, दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर मिळावा. या व इतर मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज इंदापुरातील शेतकऱ्यांनी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दूध ओतून देत रास्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनात तरूण व सुशिक्षित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांदलगाव येथील ओंकार सरडे व सागर पेटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पोलीस निरीक्षक दिलीप पवार व मंडलाधिकारी सोपान हगारे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सरडे व पेटकर यांनी सांगितले, की मागील कालावधीपासून दुधाचा दर सातत्याने घसरत चालला आहे. सध्या तो ३५ रुपयांवरुन अचानक कमी होवून २५ रुपयांवर आला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना मोठ्या अर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. शेतपीक येईल की नाही याची खात्री नाही. या आंदोलनाची दखल न घेतल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा आमचा विचार आहे, असे ही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा-‘ऑनलाइन टास्क’पासून सावधान! सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा ‘हा’ नवा प्रकार
दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर मिळावा.जनावरांसाठी चारा डेपो तयार करावेत. शासनाकडून पेंड मिळावी. प्रत्येक गावात पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करावा. गेल्या पाच वर्षातील भेसळ प्रतिबंधक कारवायांचा अहवाल सादर करावा. जनावरांसाठी विनाशुल्क विमा सुरक्षा कवच योजना सुरू करावी. दूध दर मूल्य आयोगाची स्थापना करावी, शासकीय हमीभावाप्रमाणे दर न देणाऱ्या सरकारी व खाजगी प्रकल्पांवर कारवाई करावी. अशा आमच्या मागण्या असून त्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असेही ओंकार सरडे यांनी स्पष्ट केले.