पिंपरी : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर पाेलिसांची करडी नजर राहणार आहे. मद्यपान करत वाहन चालविणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल करून वाहनही जप्त करण्याचा इशारा पिंपरी- चिंचवड पाेलिसांनी दिला आहे. शहराच्या विविध भागात रविवारी रात्री उशिरापर्यंत ३० ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक नागरिक घराबाहेर पडून मध्यरात्रीपर्यंत पार्ट्या करतात. यामध्ये काही जण नशा करुन वाहन चालवतात. स्वतः व इतरांच्या जीवास धोका निर्माण करतात. मद्यपान करून वाहन चालविणारे नागरिक पाेलिसांच्या तावडीतून सुट शकणार नाही. कारण, शहरात ३० ठिकाणी नाकाबंदी असणार आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी प्रत्येक वाहनचालकाची कसून चौकशी करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>महाविकास आघाडीचा पहिला उमेदवार ठरला, संजोग वाघेरे यांना ठाकरे गटाकडून मावळची उमेदवारी
ब्रेथ अनालायझर मशीनच्या (मद्यपानाच्या प्रमाणाची चाचणी घेणारे यंत्र) सहाय्याने श्वासाचे नमुने तपासण्यात येणार आहेत. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच वाहनही जप्त करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही मद्यपान करून धोकादायकरीत्या वाहन चालवू नये. नववर्षाचे स्वागत उत्साहाने शांततेने, कायद्याचे पालन करुनच करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पाेलीस उपायुक्त बापू बांगर यांनी केले आहे.