प्रश्न पडतो ना कोण ह्या? पण ८ सप्टेंबर २०१५ ला ८२ वर्षे पूर्ण करणाऱ्या बाईंना आज्जी नाही तर काय म्हणायचे.
डोळ्यांसमोर कमरेत जरा वाकलेल्या, तोंडाचं ब-यापैकी बोळकं झालेल्या, वयोमानाप्रमाणे हालचाली मंदावलेल्या, तब्येतीच्या तक्रारी सांगणाऱ्या आणि मुख्य म्हणजे समोरच्याला वडिलकीच्या नात्यानी कायम उपदेश करणाऱ्या आज्जी डोळ्यापुढे येणारच ना? चूक नाहीच ना त्याच्यात काही.
पण ह्या आज्जी म्हणजे आपल्या गावरान मराठी भाषेत सांगायचं झालं तर ‘लईच भारी’ आहेत. यांना १७ वेळा राज्य शासनाचा पुरस्कार मिळालाय. दादासाहेब फाळके पारितोषिक मिळालं आहे, ग्रॅमी अवॉर्ड करता नामांकन मिळालेल्या त्या पहिल्या भारतीय गायिका. पारितोषिकांची जंत्री बरीच मोठी आहे. पण आता एकच सांगून थांबवतो, ह्याचं नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये जास्तीत जास्त स्टुडिओ रेकॉर्डिंग करण्याकरता नोंदवले गेलेले आहे.
होय ‘आशा भोसलेच’ आहेत त्या आज्जी!
वीसपेक्षा जास्त भारतीय भाषेत म्हणलेली फिल्मी-नॉन फिल्मी गाणी.
ओ. पी. नय्यर, सि. रामचंद्र, सचिनदेव बर्मन, सलील चौधरी, शंकर जयकिशन, मदन मोहन, नौशाद, जयदेव, लक्ष्मीकांत प्यारेलाल, खैय्याम, हेमंत कुमार, रवी यांच्यासारख्या आधीच्या जमानातल्या एकापेक्षा एक दिग्गज संगीतकारांबरोबर केलेले काम. वर त्याची प्रौढी न मिरवता बप्पी लाहिरी, अन्नू मलिक, संदीप चौता यांच्या सोबत काम करणे आणि त्याच्याहीपेक्षा त्यांच्या चालीही आपल्या आवाजाने श्रवणीय करणे, काय सोपे काम आहे का महाराजा? पण त्यांनीच म्हणून ठेवलेल्या “मुझे डरहै मुझमे गुरुर आना जाये” सारख्या ओळी आठवत, त्या ते पण करतात. आज्जी लैच भारी!
मराठीमध्ये दत्ता डावजेकर ह्यांच्यापासून सुरूवात करून श्रीनिवास खळे, सुधीर फडके, हृदयनाथ यांच्या संगीत दिग्दर्शनात म्हणलेली गाणी कोणाला विसरता येतील? मराठीत काय हिंदीत काय असा एकही संगीतकार नसेल ज्याच्याकडे त्या गायल्या नाहीत.
दाक्षिणात्य गायक, गायिका सोडून इतरांवर फार विश्वास नसलेला (कदाचित त्यांच्या उच्चारामुळे असेल) इलायाराजा किंवा ऑस्कर मिळवणारा एकमेव भारतीय संगीतकार ए.आर.रेहमान याच्या सारख्या वयानी मुलापेक्षाही कमी असलेल्या संगीतकाराबरोबर केलेली हिंदी आणि दाक्षिणात्य गाणी फक्त आशाबाईच म्हणू जाणोत
गुलजार, आर. डी. बर्मन यांच्या सारख्या कलावंताबरोबर संगीतातल्या दर्दी लोकांच्या भाषेत ‘एखाद्या पानासारखे जमून आलेले’ त्यांचे काम, मग ते ‘साउंड ऑफ म्युझिक’ वर बेतलेला ‘परिचय’, ‘इजाजत’ सारख्या चित्रपटातले अनवट चालीचे गीत असो वा “दिलपडोसी है” सारखा “दिलको सुकून देनेवाला” अल्बम असो.
या दिग्गजांमध्येही आशा बाईंच्या आवाजाचे वेगळेपण कायमच ठसा उमटवते.
आज्जी लैच भारी!
मेहमूद सोबत त्या पाय थिरकायला लावणारे “मुत्थूकोडी कव्वाडी ह्डा” म्हणतात आणि त्याच आशाबाई
“मेराज ए गझल” म्हणत “दुरुस्त अल्फाज और आवाजकी फिरत” यासाठी साक्षात गुलाम अली सारख्या गझलनवाजाची पण वाहवा मिळवतात.
आज्जी लैच भारी!
त्यांना ना बालगीते वर्ज्य ना भावगीते. त्या ‘मुक्कामाला राव्हा पाव्हन’ सारखी एखादी लावणी ज्या ‘अंदाजात’ हरकती घेत म्हणतात, त्याच भक्तिभावाने ‘साचा नाम तेरा ,तू श्याम मेरा’ सारखे एखादे भजनही म्हणून जातात. त्यांच्या आवाजात एखादे कॅब्रे गाणे पण तेवढेच आवडतं आणि भा.रा.तांब्यांची एखादी रचनाही तेवढीच सुरेख वाटते.
एखादे ‘विसरशील खास मला, दृष्टीआड होता’ किंवा ‘गेले द्यायचे राहून’ असे भावगीत जेवढ्या सहजतेने म्हणतात, त्याच सहजतेने ‘नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच’ पण म्हणतात.
ऐकणारे ऐकत बसतात ,पण ह्या आपल्या पुढच्या रेकॉर्डिंगच्या तयारीत मग्न.
आज्जी लैच भारी!
इतर कोणी म्हणायचं धाडस नसतं केलं पण त्यांनीच त्यांचे वडील मास्टर दिनानाथ ह्यांनी अवघड रचनात बांधून ठेवलेली नाट्यगीते पुन्हा म्हणून माझ्या सारख्या आताच्या पिढीकरता अजरामर करून ठेवली.
आज्जी लैच भारी!
लतादीदी आता फक्त रियाझ करतात, बाकी आशाबाईंच्या समकालीन गायक, गायिका केव्हाच काळाच्या पडद्याआड गेल्या. त्यानंतर आलेल्या अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमुर्ती ह्यांनी गाणे थांबवले.
आशाबाईनी जेव्हा त्यांचे पहिले फिल्म फेअर अवार्ड मिळवलं तेव्हा आता पूर्वाश्रमीच्या गायिका म्हणवल्या जाणाऱ्या आणि आजच्या गायिकांच्या स्पर्धेतून कधीच बाहेर पडलेल्या, वाहिन्यांवर संगीतातल्या ‘महागुरु’ म्हणून काम बघत अर्धनिवृत्ती घेतलेल्या अलका याज्ञिक यांचा आयुष्यातला पहिला वाढदिवसही साजरा झालेला नव्हता.
पण या अजून नवनवीन गाणी गातच आहेत.
त्यांनी पहिलं गाणं जेव्हा रेकॉर्ड केलं तेव्हा सध्या ज्यांना सध्याच्या आघाडीच्या गायिका मानलं जातं, अशा सुनिधी चौहान, श्रेया घोषाल यांच्या आई-वडिलांचाही जन्म नव्हता झाला.
या आपल्या आशा आज्जी वयाचा ‘अवघ्या ८३ व्या वर्षात’ पदार्पण करताना एका पाश्चात्य संगीतकाराबरोबर नवीन अल्बम प्रदर्शित करण्यात मग्न आहेत.
आज्जी लैच भारी!
वडील साक्षात दीनानाथ मंगेशकर, बहिण लता मंगेशकर, ‘अव्वल दर्जा’हे शब्द स्तुतीला उणे पडावेत असा धाकटा भाऊ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, आवाजाची स्वतंत्र जातकुळी असणा-या भगिनी उषा मंगेशकर आणि संगीतकार मीना मंगेशकर. एखाद्या व्यक्तीला संगीतातले घराणे मिळावे तर कसे? ह्याचे आदर्श उदाहरण अजून काय पाहिजे? तसाच एवढ्या मोठ्या संगीत घराण्यात जन्म होण्यात एक मोठा धोका असतो, तो त्यांच्या सावलीत स्वतःमधली कला झाकोळून जाण्याचा. पण आशा भोसले ह्यांनी स्वकष्टावर हे होऊ दिलं नाही. त्या या सगळ्यांचे सोन्याचे कोंदण घेतलेल्या हि-यासारख्या चमकत राहिल्या.
आता ज्या व्यक्तीने २० पेक्षा जास्ती भाषेत, अकरा हजाराहून अधिक गाणी रेकोर्ड केलेली आहेत, त्यांचे आणि त्यांच्या आवडत्या गाण्यांचे वर्णन करायला एक ब्लॉग काय खरतर एक पुस्तकही अपुरेच आहे, नाही का?
आशा बाईंचा जन्म सांगलीचा. त्यांनी खात्रीने बालपणाचा काळ सांगली, मिरज, कोल्हापूर ह्या भागात घालवलेला आहे. त्या भागात जन्माला आलेले त्यांची कारकीर्द बघून, त्यांचे वय माहिती असलेले, आज त्यांच्या नातवाच्या वयाचे असलेले एखादे इरसाल कार्टे आता डिस्कोमध्ये ‘कम्बख्त इश्क़’ वर नाचताना अस्सल कोल्हापुरी भाषेत मनात म्हणत असेल “बाबो काय आवाजहे, आशा आजींच्या आवाजाचा नादच खुळा!
निस्सीम चाहत्याच्या अशा प्रेमळ प्रतिक्रिया फार कोणाच्या नसतात नशिबात!
आधीच म्हणलं ना आज्जी लैच भारी!
– अंबर कर्वे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा