firasta-blog_ambar-karve
अमेरिकेत विशिष्ट समुदायाला प्रवेश बंद करा – अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीचे दावेदार डोनाल्ड ट्रम्प ह्यांचे विधान.
त्याबद्दल काढा आता भारतात मोर्चे! मारा बोंबा.
आत्तापर्यंत कधीही न पाहिलेल्या डोनाल्ड ट्रम्पचे कागदी पुतळे जाळा.
आणि कपाळाला, दंडाला काळ्या फिती लावून कडकडीत बंद पाळा
संसदेच्या आणि विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आणलाच पाहिजे निषेध ठराव; डोनाल्ड ट्रम्पच्या वक्तव्याचा.
आणि जीएसटीचा संबंधच काय आंतरराष्ट्रीय सहिष्णुतेचा
अधिवेशनं तर होतंच राहतात
पण असे मुद्दे काय रोज रोज मिळतात?
करूया भारतातल्या राष्ट्रीय महामार्गांवर डोनाल्ड ट्रम्पच्या विधानासाठी रास्ता रोको.
त्यात भाज्या, दूध घेवून जाणाऱ्या ट्रकपासून अत्यवस्थ पेशंटना घेवून जाणाऱ्या अँब्युलन्सपर्यंत लाखो वाहनांसाठी ‘तुम बस यही रुको!’
वेस्टर्न ते हार्बरवर एकत्रित रेलरोको होवूनच जावूदेत.
चाकरमान्यांना ऑफिसला उशिरा जायला कधीतरी valid रिझन मिळू देत.
आपल्याच सामुहिक मालमत्तेच्या काही बसेस, एसट्या पेटतील,
हातावर पोट असलेल्यांच्या रिक्षा, टॅक्सी तर पहिल्या फुटतील.
आणि भारतात टीव्ही, फ्रीज, दारू विकणारी दुकाने नाही फोडली तर
अमेरिकेतल्या डोनाल्ड ट्रम्प नावाच्या माणसाला अक्कल तरी कशी येईल?
मुंबईपासून आसामपर्यंत आणि काश्मीरपासून केरळपर्यंत लागूदेत सगळीकडेच कर्फ्यू
रात्री घरी पोचल्यावर जेवण्याच्या बरोबर चवीला पाहू आम्ही अमेरिकेतल्या वक्तव्यावरून देश पेटल्याच्या बातम्या सगळ्या टीव्ही वाहिन्यांवर.
बघू आम्ही मन लावून अर्णब ते वागळे अशा प्रभृतींनी एकापेक्षा एक विचारवंतांना बोलवून घडवून आणलेल्या चर्चा.
परत करू निषेध त्या डोनाल्ड ट्रम्प नावाच्या कधीही न पाहिलेल्या इसमाच्या वक्तव्याचा.
मनाशीच खूष होऊ भारतातल्या लोकशाहीवर आणि इथल्या एकतेवर.
होवूदेत इकडे लाखो करोड रुपयांचं देशाचं नुकसान
पण आधी सहिष्णू जनतेविरुद्ध बोलणाऱ्यांना जीत्ते गाडू
आम्ही भारतीय कामापेक्षा नाहीतरी भावनेलाच जास्ती महत्व देतो.
पण त्याची नुकसान भरपाई तर आम्हीच देतो?
मग त्यात इतर कोणी कशाला लुडबूड करावी?
‘वी डीझर्व धिस’ म्हणून आपण कर्फ्यू असताना नवीन बाटली उघडावी
चला आजच्यापुरता विषय संपला
आणि चांगभलं म्हणायच्या आधी जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणा…
– अंबर कर्वे