firasta-blog_ambar-karve
साधारण २००४ च्या सुमारासची गोष्ट असेल. भोसरीवरून घरी परतत होतो. दुपारपासून कस्टमरच्या कंपनीत ‘पेमेंट टर्म्स’वरून डोकं उठलं होतं. ऑर्डर हातात पडल्यात जमा होती, तोच एक आनंद होता.
‘मॉर्डन कॅफे’च्या चौकात सिग्नलला थांबलेलो असताना एक लहानसा पोरगा गाडीजवळ आला.
मी स्वतः भीक द्यायच्या विरुद्ध आहे. भिकाऱ्यांना कधीच पैसे नाही देत. पण त्या मुलाच्या हातात विकायला पुस्तकं दिसली. अशा गोष्टी या मुलांकडून घ्यायची संधी मात्र मी कधीच सोडत नाही. त्या मुलाला हात दाखवून गाडी बाजूला घेतली. मुलगा आला, ६० रुपयाला ४ पुस्तकं घ्या म्हणाला. सहज पुस्तकं बघितली तर लहान मुलांची स्केचबुक होती. बरी वाटली. नुकताच जोराचा पाऊस येऊन गेल्यामुळे आणि रात्री नऊची वेळ झाल्यामुळे रस्त्यावर पण अगदीच तुरळक गर्दी होती. पोरगा वयाने असेल ११-१२ वर्षांचा पण पक्का सेल्समन होता. शेवटची थोडीच शिल्लक आहेत, घेऊन टाका. स्वस्तात देतो म्हणाला. मला नाही आवडत कधीच बार्गेनिंग करायला आणि मुलांच्या बरोबर तर नाहीच. पण एक विचार करून त्याला म्हणालो मी १० सेट घेतो. कितीला देणार? क्षणभर विचार करून शंभरला देतो म्हणाला. त्याला विचारलं किती दिवस पुस्तकं विकतोयस? तर म्हणाला, पुस्तकं नाही, मला हातात जे काही मिळत ते सगळं मी विकतो.
मला जाता जाता ‘सेल्स’मधला एक गुरु भेटला होता. नाव विचारलं म्हणाला ‘दत्तू’, गाव उमरगा.
मनात म्हणलो चला आज गुरुवार, बहुतेक प्रत्यक्ष ‘दत्तगुरूंच ‘आले आपल्याला ज्ञान द्यायला.
त्याला म्हणालो काही खाणार? बहुतेक त्याचा विश्वास नाही बसला. म्हणला ‘पुस्तकांचे पैसे आधी देणार का नंतर?’ हसू आलं मला. म्हणलो दे पुस्तकं आणि घे पैसे. १० सेटचे १०० दिले. वरती शंभरची नोट ठेवली त्याच्या हातात, म्हणलो असुदे तुला बक्षीस.
एक मिनिट शांत झाला आणि म्हणाला ‘चला साहेब, आपण डोसा खायला जाऊ, समोर लई भारी डोसा भेटतो बोलत्यात’. अस्मादिकांनी गाडी पार्क केली रस्त्यावरच. त्याच्या हाताला धरून रस्ता क्रॉस करून समोर ‘मॉर्डन कॅफे’मध्ये शिरलो. मला त्यांच्याबरोबर आत शिरताना काऊंटरवरच्या अण्णांनी थोडसं आश्चर्यानी पाहिलं. आत पाहिलं तर हॉटेल बऱ्यापैकी रिकामं होतं. समोरच बसलो. त्याला मेनुकार्ड दिलं. म्हणलो काय हवं ते मागव. समोर पाण्याचे ग्लास आणून ठेवणाऱ्या वेटरला त्याने झोकात मसाला डोस्याची ऑर्डर दिली वरती ‘अमूल ज्यादा मारना’ असही ऐकवलं, माझी ऑर्डर घेत, वेटर त्याच्याकडे एक तिरका कटाक्ष टाकत काही न बोलता निघून गेला. मला पोराच्या ‘कॉन्फिडन्सचं’ कौतुक वाटायला आधीच सुरुवात झालेली होती. आजुबाजूची टेबले आमच्याकडे कुचेष्टेनी बघतच होती. मी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे एखादा ठेवणीतला पुणेरी कटाक्ष टाकत दुर्लक्ष करत होतो. (मला काय किडा कमी नाहीये, पण त्याच्याबद्दल परत कधीतरी)
मग आली आमच्या मुलाखतीची वेळ, म्हणलो काय रे दत्तू? पुण्यात कधी आलास?
“२-३ वर्षे झाली म्हणाला. “आईबा मजुरी करायची, बा वारल्यावर तिला कामं मिळण कमी झालं. मी आणि माझ्यापेक्षा बारकी बहीण हाय, मग एका नात्यातल्या मामानी सांगितलं पुण्यामुंबैकडे लई कामं भेटत्यान, तिकडच जा, ऱ्हावा आणि खावा. आईनी जरुरीपुरती चा भांडी, होते नव्हते ते कपडे गोळा केले, घराला अडसर लावला आणि आलो मंग पुण्याला.”
विचारलं राहता कुठे? इथेच राहतो म्हणाला. रस्त्याच्या पल्ल्याडच्या झोपडपट्टीत. खोली घेतलिया भाड्यानी. आई सोसायट्यांमध्ये धुण्याभांड्याची कामं करते, मी इकडे येतो. त्याला विचारलं ‘कोण देतं रोज विकायच्या गोष्टी?’ म्हणाला “हाय ना ठेकेदार आमचा”. रोज सकाळी ‘बॉम्बे ‘वरून आलेल्या वस्तू देतो, काय बोलायचं असत ते आणि भाव सांगतो, पैसे घेतो आणि निघून जातो.”
आता धंद्याच्या गप्पा सुरु झाल्यावर पोरगा बोलायच्या मूड मध्ये आला होता.
मी विचारलं ‘म्हणजे कमिशन वर काम करतोस का?’ तर अभिमानानी दत्तू म्हणला “नाय सायेब, आता आपला आपण माल रोज इकत घेतो आणि दुसऱ्यांना इकतो. स्वतः दुपारी काहीतरी खातो आणि रात्री राहिलेले पैशे आईकडे देतो’’ आता गेल्या वर्षीपासून आईपेक्षा लई जास्त कमावतो” मी विचारलं, बहिणीचं काय? तिला तरी शाळेत पाठवता का? हां मंग? ती जाते की कॉर्पोरेशनच्या शाळेत. शिकते, अन मलाबी थोडं शिकवते. गावाकडे पन जास्त नाही जायचो शाळेत. पर आई बोलते थोडातरी लीव्ह्याला वाचायला शिक, कुठंतरी उपेगाला येईल. म्हून थोडं शिकतो. सायेब दिवसभर बाह्येर फिरल्यावर लई कटाळा येतो. पर आता धाकल्या बहिनीसमोर गप बसतो. ते पाढे अन इंग्लिशभाषेचे धडे काय केल्या डोक्यात नाही शिरत, पर आईला दाखवायला हो हो करतो. आता एकदोन वर्ष जावूदे, मग बघा आईचे काम बंद करायला लावतो का न्हाई?पलीकडच्या सोसायटीमध्ये flat घेणार भाड्यानी. तिकडे राहणार.
मी मनात म्हणलं दिवसभर शेकडो लोकांशी बोलणाऱ्याला आणि त्यांना दररोज वेगवेगळी वस्तू घ्यायला “कन्व्हिन्स “करणाऱ्याला काय फरक पडतो भाषेचे धडे नाही म्हणता आलेतर? आणि या वयात सगळा घरचा खर्च भागाणाऱ्याला कशाला आले पाहिजेत पाढे यायला?
तेवढ्यात आमचा डोसा आला. दत्तूनी एकदा माझ्याकडे हळूच बघत दिलेला काटाचमचा बाजूला ठेवून मस्तपैकी हातानी चटणी, सांबारात बुडवून डोसा खायला सुरुवात केली. मला तर कधीच डोसा हा प्रकार फोर्क नि खाता येत नाही, त्यामुळे मी पण तसाच खायला सुरुवात केल्यावर एकदम मनमोकळ हसला. म्हणला साहेब आज तुम्ही आणल ना बरोबर म्हणून हॉटेलवाल्यांनी आत घेतला, नाही तर बाहेरूनच “चल जा असं म्हणत्यात. आपले कपडे नसतात ना चांगले म्हून. नाय तर आपणपण इथल्या वेटर एवढंच कमावतो”.
क्षणभर विचार आला; श्रीमंतीची व्याख्या कुठेही गेलं तरी साधारण एकसारखीच. प्रत्येकाला दुसऱ्या बरोबर बरोबरी करतच पैसा कमवायला लागतो. मग तो खराखरा पैशांनी श्रीमंत असो किंवा रस्त्यावर वस्तू विकणारा मुलगा.
सहज विचारलं किती सुटतात रे महिन्याचे? म्हणाला ”सांगू नका कोणाला, हफ्त्याला खर्च जावून ९-१० हजार मिळतात. पन आक्खा दिवस सिग्नलला थांबायला लागतं. कधी रस्ता बंद करतात, कोणी मोठी पार्टी (मंत्री वगेरे) येणार असली की पोलीसलोक हाकलून देतात, मग जरा कमी होतो” मी मनात म्हणलं, म्हणजे महिन्याचे कमीतकमी ३५-४० हजार? आयला, माझी आजची ऑर्डर झाली असती तर त्यात मला जेमतेम २० हजार मिळाले असते, ते पण सगळं सुरळीत पार पडल्यावर एक महिन्यानी.
मनात म्हणलं “लेका तुला सगळ्या वेटर्सपेक्षा जास्ती पैसे मिळतात. कशाला त्यांच्याशी बरोबरी करतोस? तू तर स्वतःचा राजा आहेस” डोसा खावून झाल्यावर त्याला विचारलं आता अजून काय घेणार? म्हणाला तुम्हीच सांगा तुम्ही काय घेणार साहेब? मी म्हणलो आरे मी आणलंय ना तुला इथे,तर आता तू सांगायचं. आपण ऑर्डर करू. दत्तू म्हणाला साहेब तुम्ही दिले ना पैसे एवढे? आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी. मी ओशाळलो, म्हणलं ह्या छोट्या गरीब पोराकडे मन केवढं मोठं आहे? मी म्हणलो “दत्तू आज तू मला पहिल्यांदा भेटलास ना? म्हणून आज हॉटेलचे पैसे मी देणार, आता बोल अजून काय घेणार?” त्याचा कोमेजलेला चेहेरा समजत होता, म्हणाला, नको साहेब, भूक संपली. आता मला जेवण पण नाय जानार, जाऊ आपण” असं म्हणून पटकन हॉटेलच्या बाहेर जाऊन उभा राहिला.
मी बिल भागवून वेटरला टिप ठेवून निघालो. बाहेर पडत असताना हॉटेलच्या काऊंटरवरचा अण्णा जरा सलगीत येवून म्हणला, “साब ये बच्चा दिनभर इधर चौकमे क्या क्या बेचता रेहता है, हम लोग हमेशा देखते है उसको. आज पेहेली बार इधर अंदर आके खाना खाके गया. बहोत अच्छा बच्चा है, गंदे बच्चोसे हमेशा दूर रेहता है. लेकीन क्या करे साब, हमलोगका भी धंदा है ना? हम लोग उसको अंदर आके खानेके लिये बोलेगा तो बाकीका कस्टमर आना बंद करेगा” मला त्याचंही पटले. पण आता काय सांगणार त्याला आणि त्याच्या कस्टमरना? जाताना हॉटेलमध्ये सहज नजर टाकली तर जे लोक बसलेले होते,त्यातल्या कित्त्येकांपेक्षा तो पोरगा कितीतरी जास्त कमवत असणार. फक्त रस्त्यावर काम करतो म्हणून त्याला ‘ते स्टेट्स’ नव्हतं.
बाहेर पडलो तर दत्तू गाडीपाशी जावून थांबला होता. आत बघत होता. त्याला विचारलं, मारायची का एक चक्कर गाडीतून? तुम्हाला सांगतो, ते ऐकल्यावर त्याच्या चेहेऱ्यावर जे भाव पाहिले ना, खल्लास.
त्याला शेजारच्या सिटवर बसवून एक छोटीशी चक्कर मारून पुन्हा सिग्नलला सोडले. गाडीच्या बाहेर नवलाईने बघत होता.उतरल्यावर बघून समाधानानी हसला. म्हणाला “साहेब, पुन्हा कवा येनार?” म्हणलो अरे मी येत असतो मधूनमधून इकडे, आता तुला बघितलं की थांबीन नक्की. “हात मिळवल्यावर तर ते दत्तगुरू एकदम प्रसन्नच झाले” नक्की या म्हणाला, मी आईला आणि बहिणीला काहीतरी चांगलं घेऊन सिधा घरी जानार. सांगनार आज आपण गाडीतून चक्कर मारली, अजून माझ्याबरोबरची कोणी पोरंपन गाडीच्या आत बसली नाय. मीच पहिला.” मी नंबरात आलेल्या त्या पोराला हसून टाटा केला.
तो जाताना बघत क्षणभर विचार करत बसलो, या पोराकडे शहरातल्या कित्येक पोरांपेक्षा केवढ्या गोष्टी जास्ती आहेत? याला पैशांची किंमत समजते, आई कष्ट करून घर चालवते त्याची जाणीव आहे. स्वतः शिकत नसला तरी बहिणीचे शिक्षण पूर्ण करायची अक्कल आहे. पुढे काय करायचं त्याचा प्लानिंग तयार आहे. आज हा पोरगा कष्ट करून एवढे पैसे कमावतोय, आपल्याकडे १२ वर्षांच्या एखाद्या मुलाला चाळीस हजार नुसते मोजायला सांगितले तरी नीट जमतील की नाही शंका आहे. पण आपल्याकडे कष्ट करून पैसे कमावणाऱ्या व्यक्तींपेक्षा, नुसतेच बडेजाव दाखवणाऱ्याची चलती जास्ती असते.
हा पोरगा नक्की पुढे जाणार आयुष्यात, अशी खुणगाठ मनात बांधून गाडी सुरु केली, रेडियो लावला, नेमकं अनाडीमधलं ‘किसीकी मुस्कुराहटो पे हो निसार’ लागलं. योगायोगच म्हणायचा नाहीतर काय…
– अंबर कर्वे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा