जाते थे जापान, पहुँच गए चीन, समझ गए ना? जादुई आवाजाच्या किशोरकुमारने गायलेल्या या गीताप्रमाणेच आमची गत झाली. वास्तविक आम्ही निघालो होतो एका विशिष्ट कामासाठी पनवेलला. परंतु, त्यासाठी रुक्ष आणि एकसुरी असलेल्या एक्स्प्रेस वे पकडण्याशिवाय तरणोपाय नव्हता. पुण्यातून निघायलाही तसा खूपच उशीर झाला होता. सरळसोट रस्त्याने आम्ही इच्छित ठिकाणी दोन तासांच्या आत पोचलो असतो.
nature2कुत्र्याचं शेपूट बारा वर्षे नळीत घालून ठेवलं, तरी वाकडी ती वाकडीच, ही म्हण आम्हालाही लागू होतीच. त्यामुळंच पोटाची आणि गाडीची अशा दोन्ही प्रकारच्या टाक्या भरतानाच आम्ही आमच्या मूळच्या आराखड्यात अत्यंत आनंदानं बदल केला आणि आमच्या स्वयंचलित रथाचं चक्र माले-मुळशीच्या दिशेनं वळवलं. जाण्याची घाईच नाही, तर निदान निसर्गाचं रसपान तरी करावं, या आमच्या मूळ हेकट स्वभावानं उचल खाल्ली होती. नागमोडी वळणांची सवय झालेल्या आमच्यासारख्यांना, वाकडी वाटच आपली म्हणण्यात स्वारस्य असते. गर्दी टाळायची, तर अर्थातच धोपट मार्ग सोडूनच जाण्यात शहाणपण होतं!
ही वाट तशी अनवट असली, तरी आमच्या पायाखालची किंवा चाकांखालची म्हणा ना! दरवर्षी पावसाळ्यात या परिसरातून चार-पाच चकरा मारल्याशिवाय चैनच पडत नाही. त्यामुळं वाचकांसोबत ते शेअर करावं एवढाच हेतू. पावसाळा आता पुण्यात दाखल झालाय. पुणेकरांची त्रेधा-तिरपिट उडणार असली, तरी मावळ खोऱ्यात मात्र त्याचं जोमात स्वागत होतं. पुढच्या पंधरा दिवसांत निसर्गाचं हे आनंदवन निसर्गवेड्यांसाठी खुलं होणार आहे.
फोटो – पाचूच्या डोंगरातून कोसळत्या धवलधारा…
मुळशी खोऱ्यातील माले या गावापर्यंत वाहनांची वर्दळ असल्यामुळं, आजूबाजूला हिरवाईनं नटलेल्या निसर्गाकडं आम्हाला फारसं लक्ष देता आलं नाही. पावसाची भुरभुर चालू असल्यानं, आपण योग्य मार्ग पकडल्याचं आम्ही मनोमन मान्य करून टाकलं. माले हा ताम्हिणीच्या रस्त्यावरील महत्त्वाचा टप्पा. एक रस्ता ताम्हिणी घाटाकडं तर दुसरा लोणावळ्याकडं जातो. रविवारचा दिवस म्हणजे ताम्हिणीच्या रस्त्यावर मरणाची गर्दी. निसर्गाचा आनंद द्विगुणित होण्याऐवजी शतवजाच होण्याची शंभर टक्के ग्यारंटी. शिवाय आम्हाला ज्या वाटेनं जायचंच नव्हतंच, ती वाट धरा कशाला ?
natureआम्ही उजवा रस्ता धरला. मुळशी धरणाला डावी घालून छोटासा घाटरस्ता चढून वर आल्यानंतर डावीकडे आपोआप नजर वळली आणि नकळत उदगार निघतो अहाहा ! खोऱ्यात खाली दिसणारी भातशेती, कौलारू घरं आणि हिरवाईनं नटलेला निसर्ग अप्रतिमच ! जलप्राशन करून तृप्त झालेल्या धरित्रीचा अवर्णनीय आनंदच या हिरवाईच्या रूपानं अंकुरल्याचा भास होतो. संपूर्णपणे नागमोडी रस्त्यानं जात असताना काय पाहू आणि काय नको, असं होऊन जातं. धबधबे तर असंख्येनं कोसळत असतात.
जमिनीनं तृप्तपणे हिरवा गालिचा धारण केला होता. नाकतोड्यांची गर्दी उडाली होती आणि ते पकडण्यासाठी बेडकांच्या उड्या पडत होत्या. भातशेतीतून बाहेर पडलेले पांढरे खेकडेही रस्त्यावरून तिरकस चालीनं तुरुतुरू जाताना दिसतात. एखाद्या पाणवठ्याजवळ चतुरांची गर्दी उसळली होती. ते पकडण्यासाठी वेड्या राघूंची (लिटल ग्रीन बी ईटर) पक्ष्यांच्या हवेतल्या कसरतीही योग असला, तर पाहता येतात. मध्येच पावसाची उघडीप मिळाल्यानं, विविध प्रकारचे पक्षी आपले पंख वाळवताना दिसत होते. मोठमोठ्या झाडांवर शेवाळं लोंबत होतं आणि परजीवी वनस्पती उगवल्यानं झाडांचे बुंधे दिसेनासे झाले होते. रानफुलं तर अगणितच ! निसर्गाचं हे दिमाखदार रुपडं पावसाळ्यात एकदा तरी अनुभवायलाच हवं.
सोबत चांगला कॅमेरा असावा, कार्डमध्ये भरपूर स्पेस असावी आणि बॅटऱ्या फुल्ल असाव्या, वाटल्यास एखादा जादाचा संचही असावा. बस्स. आणखी काय हवं. कॅमेऱ्यातून दिसणारं हे मावळखोरं आपल्या स्वागतासाठी सज्ज होतं आहे.
– अरविंद तेलकर
arvind.telkar@gmail.com

Story img Loader