बांगलादेशला हरवून भारताने आशिया करंडक जिंकला. आठ गडी राखून विजय म्हणजे मोठाच विजय. पण प्रतिस्पर्ध्याला गारद करणारा किंवा धूळ चारणारा असे या विजयाचे शिल्प साकार करण्यात आपण कमी पडलो. कृपया हे कोणीही आनंदावर विरजण टाकणारे वाक्य या अर्थाने घेऊ नये. टी २०चा विश्वचषक आठवड्यावर आलेला असताना काही खडबडीत बाजू गुळगुळीत करुन घ्याव्या लागतील.
पहिली गोष्टं म्हणजे जेव्हा खेळपट्टीकडून मूव्हमेंट मिळत नाही (विश्वचषकातील भारतातील खेळपट्टया अशा असण्याचीच दाट शक्यता आहे) तेव्हा फलंदाजाला वेगवान आणि अचूक माऱ्याने बांधून ठेवण्याची क्षमता असलेला गोलंदाज हार्दिक पंड्या नाही, हे काल दिसून आलं. नेहरा आणि बूमराह १४० च्या वेगाने अचूक टाकू शकतात. पण पाटा खेळपट्टयांवर पंड्याची गोलंदाजी ‘कमजोर कडी’ ठरू शकते. आणि टी २० सामन्यात चार षटकं म्हणजे खूपच मोठी गोष्टं आहे. त्यामुळे काल सामना संपल्यावर बोलताना जेव्हा रवि शास्त्री म्हणाला की गोलंदाजीच्या काही गोष्टींकडे आम्हाला लक्ष द्यायला हवे तेव्हा त्याच्या मनात हा प्रश्न असणार.
दुसरा तितकाच महत्वाचा प्रश्न म्हणजे षटकारांच्या अभावाचा. कालच्या सामन्यात धोनी फलंदाजीला येइपर्यंत (धोनी १३ व्या षटकात आला) फक्त एक षटकार मारला गेला होता. कोहली आणि धवन चौकारांवर धावा मिळवत होते. पण ते चौकार मिळवताना अनेक क्लुप्त्या लढवायला लागत होत्या. षटकार मारले न गेल्याने आस्कींग रेट ९, १०च्या खाली येत नव्हता. त्यामुळे विकेट पडल्या नाहीत तरी तणाव कायम होता. तो तणाव आपल्या डग आउटमधल्या चमुच्या देहबोलीतून जाणवत होता. षटकारने सहा धावा मिळतात इतके त्याचे मर्यादित महत्त्व नाही. एखाद्या फलंदाजाने लांब स्टेडियममध्ये चेंडू फेकून दिला तर गोलंदाज वेगळा विचार करू लागतो. तसाच दुसरा षटकार बसला तर तो मनातून शस्त्र टाकून देतो आणि फील्डिंग करणारा संघ हतबल होऊ लागतो. धोनीने आल्या आल्या जो पहिला आरपार षटकार खेचला तेव्हा वातावरणात कसा बदल झाला ते आपण पाहिलेच. भारतीय खेळाडू डग आउटमध्ये विलक्षण आश्वस्त झाले आणि बांगलादेशी खेळाडूंचे खांदे पडले. प्रतिओव्हर १० धावा हव्या असताना तुम्ही फार काळ चौकारांच्या भरवशावर खेळू शकत नाही. आस्किंग रेट कुठेतरी कमी व्हायलाच हवा. नवीन फलंदाजाना १०चा आस्किंग रेट चालू ठेवणे अवघड जाते. पहिल्या तीन फलंदाजांत आपल्याकडे ही जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी. इतर संघांकडे असे मॅचचा ‘निकाल’ लाऊन टाकणारे फलंदाज आहेत.
आता राहिली गोष्टं बांगलादेशच्या प्रेक्षकांची. भारतीय प्रेक्षकांनी बांगलादेशी प्रेक्षकांच्या उन्मादाला फारच मनाला लाऊन घेतल्यासारखं दिसतय. चेव चढलेल्या बांगलादेशी प्रेक्षकांना भारतीय खेळाडूंनी आपल्या खेळातून चांगली अद्दल घडवावी, अशा प्रकारचे मेसेजेस सोशल मीडियावर जोरात चाललेले होते. आपल्या प्रेक्षकांनी बांगलादेशी प्रेक्षकांना फार मनावर घेऊ नये. बांगलादेश अविकसित देश आहे. लोकांची परिस्थिती
भूक, मेहंगाई, गरिबी
इश्क़ मुझसे कर रही थी|
एक होती तो निभाता
तिन्हों भी मुझपे मर रही थी|
अशी आहे. या विपरीत परिस्थितीत क्रिकेट हे त्यांचे जगण्याचे कारण आहे. एखाद्या विजयामुळे त्यांचा एक आठवडा आनंदात जाऊ शकतो. अनेक आफ्रिकन राष्ट्रांत फुटबॉलने जे काम केले आहे, तसे बांगलादेशात क्रिकेटने केले आहे. त्यामुळे ते त्यांच्या आनंदाला शोधत असतात. आपण त्यांचा तो उत्साह मनाला लाऊन घेऊ नये.(भारतातदेखील अनेक लोकांचा आनंद क्रिकेटच्या मैदानावरील घटनांशी जोडला आहे) उलट त्यांच्या घोषणांनी आपल्या खेळाडूंना चेव चढून आपण विजयश्री खेचून आणली त्याबद्दल बांगलादेशी प्रेक्षकांचे शतश: आभारच मानायला हवेत. नाही का?
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
BLOG : षटकाराचे महत्त्व फक्त सहा धावांपुरते नाही!
कालच्या सामन्यात धोनी फलंदाजीला येइपर्यंत फक्त एक षटकार मारला गेला होता
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 07-03-2016 at 10:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog by ravi patki on asia cup final match