पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये पार्टीसाठी आलेल्या दहा जणांच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी घेतले आहेत. त्यांच्या रक्ताची चाचणी केल्यानंतर अमली पदार्थाचे सेवन केले होते की नाही, याबाबतची माहिती मिळेल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड, लिजर, लाऊंज (एल थ्री) पबमधील प्रसाधनगृहात तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची चित्रफीत प्रसारित झाली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित पब लाखबंद केला, तसेच पबचालकासह व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. पोलिसांनी पबमधील पार्टीत सहभागी झालेल्या दहा जणांच्या रक्ताचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी घेतले आहेत.
हेही वाचा >>> पाणी तुंबल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा इशारा
एखाद्या व्यक्तीने अमली पदार्थाचे सेवन केले असेल तर त्याच्या शरीरात ४८ तास त्याचा अंश राहतो. त्यामुळे पार्टीत अमली पदार्थांचे सेवन केले असल्यास त्याची माहिती वैद्यकीय तपासणीत उघड होईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. पार्टीत अमली पदार्थांचे सेवन करणारी मुले पसार झाली आहेत. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पार्टीचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना त्या तरुणांची माहिती नाही. पार्टीत सहभागी झालेल्या तरुणांनी ऑनलाइन पद्धतीने पैसे दिले आहेत. पार्टीत अमली पदार्थांचे सेवन झाले असेल, तर अमली पदार्थ कोठून आले, त्याची विक्री कोणामार्फत करण्यात येत होती. याचा तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.